Press "Enter" to skip to content

श्रमयोगी मानधन योजनेद्वारे दरमहा १८०० रुपये मिळविण्याच्या आमिषाने होईल फसवणुक! सावधान!

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेकरीता (Pradhanmantri Shram Yogi Mandhan Yojna) अर्ज केल्यास आपल्या खात्यात दरमहा १८०० रुपये जमा होतील, अशा प्रकारचे दावे करणारे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होताहेत. त्यात अर्ज भरण्यासाठीची लिंक देखील देण्यात आली आहे.

Advertisement

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना: सरकारी योजना, इस फॉर्म को भरणे प्र मोदी सरकार १८०० रुपये प्रति माह दे रही है! उम्र सीमा १८ से ४० वर्ष‘ अशा मजकुरासह लिंक व्हायरल होत आहे.

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक गोविंद भुजबळ, जगदीश काबरे, विलास मोहिते, जगदीश नलावडे आणि यासीन मुलाणी यांनी सदर मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने आजवर अशा विविध सरकारी योजनांद्वारे निधी/मानधन/पैसे मिळवून देण्याचे दावे करणाऱ्या व्हायरल मेसेजेसची पोलखोल केली आहे. याच पूर्वानुभवावरून हे सहज लक्षात येत की सदर मेसेज खोटा आहे.

कुठल्याही सरकारी योजनेकरिता अर्ज करण्यासाठी अधिकृत केंद्र असतात किंवा अधिकृत सरकारी वेबसाईट असते. सदर व्हायरल मेसेजमध्ये असणाऱ्या लिंकवर क्लिक केल्यास yojana.blogspot.com अशी वेबसाईट ओपन होते. ब्लॉगस्पॉटवर कुणीही फुकटात वेबसाईट बनवू शकते, सरकारी वेबसाईट अशी नसते. त्यात सामान्यपणे gov.in असे एक्सटेंशन असते.

Source: Blogspot

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या PIB च्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही सदर मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना काय आहे?

भारत सरकारमार्फत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (pradhanmantri shram yogi mandhan) चालविण्यात येत आहे. परंतु या योजनेतून दरमहा १८०० रुपये वितरित करण्यात येत असल्याचा दावा फेक आहे. ही एक असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांसाठीची पेन्शन योजना आहे.

ज्या नागरिकांना नोकऱ्या आहेत, त्यांच्या कंपनीद्वारे दरमहा ‘प्रोव्हिडंट फंड’मध्ये पैसे जमा होतात किंवा त्यांना निवृत्ती वेतनाची अधिकृत तरतूद आहे अशा नागरिकांव्यतिरिक्त रोजंदारीवर किंवा छोट्याशा व्यवसाय स्वरुपात काम करणाऱ्या असंघटीत क्षेत्रातील कष्टकरी वर्गाला उतारवयात दरमहा निवृत्तीवेतन असावे या उद्देशाने सुरु केलेली ही योजना आहे.

या योजनेद्वारे १८ ते ४० वयोगटातील मासिक १५००० पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वयानुसार किमान ५५ ते कमाल २०० रुपये प्रतिमाह जमा करावे लागतील. याच पैशांतून वयाच्या साठीनंतर दरमहा ३००० रुपये निधी चालू होईल. एखाद्या विमा योजनेप्रमाणे ही योजना आहे. यात कुठेही घरबसल्या निशुल्क स्वरुपात मानधन मिळण्याची तरतूद नाही. यासाठी अधिकृत माहिती मानधन या शासकीय वेबसाईटवर मिळेल.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या नावे दरमहा १८०० रुपये मिळण्याचे दावे करणारे व्हायरल मेसेज फेक आहेत. तसेच सदर सरकारी योजना असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या निवृत्तीवेतनासाठी आहे.

व्हायरल मेसेजमधील लिंकवर क्लिक करून त्यांनी विचारलेली वैयक्तिक माहिती भरत बसलात तर आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते.

हेही वाचा: ‘केंद्र सरकार दरमहा ३५०० रुपये बेरोजगार भत्ता देणार, रजिस्ट्रेशन करा’ लिहिलेले मेसेज फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा