Press "Enter" to skip to content

लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांकडून फडकविण्यात आलेला झेंडा खलिस्तानचा नाही!

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली. या परेडदरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर पिवळ्या रंगाचा झेंडा फडकावला. या अभूतपूर्व घटनेननंतर सोशल मीडियावर आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून त्याठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकावल्याचे (khalistan flag on red fort) दावे केले गेले.

Advertisement

केवळ सोशल मीडियावरच नाही, तर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी देखील अशाच बातम्या चालवल्या. इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाईम्स नाऊ’ने तिरंगा हटविण्यात आल्याची बातमी दिली, तर मराठी वृत्तपत्र ‘दै. दिव्य मराठी’च्या शेतकऱ्यांनी तिरंगा हटवून खलिस्तानी झेंडा फडकावल्याच्या बातमीचा स्क्रिनशॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.

news claiming khalistani flag
Source: Divya Marathi/ Times Now

शेफाली वैद्य, इशिता यादव,अनुराग दीक्षित यांसारख्या ‘ब्लू टिक’ धारक युजर्सनी अशाच प्रकारचे दावे केले आहेत. अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील आंदोलक शेतकरी हे दहशतवादी असल्याचा आरोप करत लाल किल्ल्यावर हल्ला करून खलिस्तानी झेंडा फडकाविणाऱ्या (khalistan flag on red fort) शेतकऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावल्यानंतर प्रामुख्याने दोन दावे केले गेले. पहिला म्हणजे लाल किल्ल्यावर फडकविण्यात आलेला झेंडा खलिस्तानचा आहे आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांनी तिरंगा हटवून खलिस्तानचा झेंडा फडकावला.

१. आंदोलक शेतकऱ्यांनी फडकावलेला झेंडा खलिस्तानचा आहे का?

आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर दोन वेगवेगळे झेंडे फडकावले. पहिला झेंडा जो आहे तो, शीख धर्माचा पवित्र ‘निशान साहिब’ आहे आणि दुसरा झेंडा हा ‘किसान मजदूर एकता’ या शेतकरी संघटनेचा आहे. खलिस्तानच्या झेंड्याचा काहीही संबंध नाही.

पंजाबच्या मोहाली येथील स्वतंत्र पत्रकार कपिल शर्मा यांनी ‘चेकपोस्ट मराठी’शी बोलताना सांगितले की ‘निशान साहिब’ हा शीखांचा पवित्र त्रिकोणी ध्वज आहे. प्रत्येक गुरुद्वाराच्या बाहेर हा ध्वज फडकावला जातो.

ध्वजाच्या मध्यभागी खंडा या हत्याराचे चिन्ह (☬) आहे, ज्याला ‘खंडा साहिब’ असं देखील म्हंटलं जातं.

किसान आंदोलन: जानिए, लाल किले पर लहराए गए निशान साहिब की कहानी - Kisan Andolan Nishan Sahib flag hoisted by protesters at Red Fort history of this flag tlifd - AajTak

निशान साहिब हा ध्वज खालसा पंथाचे पारंपरिक प्रतीक समजला जातो. गुरुद्वाऱ्यात दर्शनाला गेल्यानंतर डोक्यावर जो पटका बांधला जातो त्यावर देखील हा ध्वज असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे नेते गुरुद्वाऱ्यात डोक्यावरील पटक्यावर देखील हा ध्वज बघायला मिळेल.

आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर झेंडा का फडकावला?

कपिल शर्मा सांगतात, “आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर ‘निशान साहिब’ फडकविण्यामागे जनरल बघेल सिंह यांची प्रेरणा असू शकते. सिख जनरल बाबा बघेल सिंह यांनी ११ मार्च १७८३ रोजी मोगलांविरुद्धच्या लढाईत सुलतान शाह आलमचा पराभव केल्यानंतर लाल किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ ताब्यात घेऊन लाल किल्ल्यावर केसरी ध्वज फडकावला होता.”

२. आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा हटवला?

आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा हटविल्याचे दावे देखील निराधार आहेत. लाल किल्ल्यावरील तिरंगा आहे, त्याच ठिकाणी होता. आंदोलक शेतकऱ्यांनी आपले झेंडे तिरंग्याच्या बाजूला फडकविल्याचे अनेक फोटोज उपलब्ध आहेत. या फोटोजमध्ये तिरंगा आहे त्या ठिकाणी बघितला जाऊ शकतो. आंदोलक शेतकरी आपले झेंडे फडकवत असलेल्या फुटेजमध्ये देखील तिरंगा बघायला मिळतो.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर केले जाणारे दावे संपूर्णतः चुकीचे आहेत. ना लाल किल्ल्यावरील तिरंगा हटविण्यात आला, ना शेतकऱ्यांकडून फडकविण्यात आलेला झेंडा खलिस्तानचा आहे. शेतकऱ्यांकडून फडकविण्यात आलेला एक झेंडा सिख धर्माशी संबंधित असून दुसरा झेंडा एका शेतकरी संघटनेचा आहे.

हे ही वाचा- दिल्लीतील शेतकरी आंदोलन ‘खलिस्तानी’ लोकांनी ‘हाय जॅक’ केल्याच्या दाव्यात किती तथ्य?

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा