‘संघाने इंदौर येथे ४५ एकर जागेमध्ये उभे केले भारतातील सर्वात मोठे कोविड केयर सेंटर (indore covid center) ज्यामध्ये ६००० बेड व ४ ऑक्सिजन प्लांट आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन त्यांच्या कार्यास समर्पीत!’ असे दावे करणाऱ्या पोस्ट्स राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थकांकडून सोशल मीडियातून फिरवल्या जाताहेत.
आम्ही हिंदुत्ववादी, पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, नितीन गडकरी फॅन क्लब यांसारख्या फेसबुक पेजेसवरून आणि वैयक्तिकरित्या अनेक पोस्ट्स शेअर झाल्याचे दिसत आहेत.
काही लोक दुसरी एक ईमेज शेअर करताना दिसत आहेत. ज्यामध्ये ते कोव्हीड सेंटर भव्यदिव्य भासतेय.
पडताळणी:
१. व्हायरल फोटोत दिसणारी भव्य ईमारत भारतातील नाही
आम्ही जेव्हा व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स इमेज सर्च केला तेव्हा लक्षात आले की हा फोटो इंदौर काय, भारतील देखील नाही. सदर फोटो कतार मधील ‘अल बायत फुटबॉल स्टेडीयम’चा आहे. नियोजित ‘२०२२ फिफा वर्ल्ड कप‘ पहिल्यांदाच अरब राष्ट्रांत होणार आहे, त्यातील नियोजनानुसार पहिला सामना याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
२. इंदौरचे कोव्हीड सेंटर कुणी उभारले?
‘दैनिक भास्कर‘च्या बातमीनुसार मध्यप्रदेश प्रशासनाने ‘राधा स्वामी सत्संग ब्यास’ (RSSB) मैदानावर हे कोव्हीड सेंटर उभारले आहे. ANI या न्यूज एजन्सी सोबत बोलताना राज्य मंत्री तुलसी सिलावत यांनी सांगितले की या सेंटरसाठी इंदौरमधल्या अनेक उद्योजकांनी पैसे आणि साहित्य दान करून सहाय्यता केली. या कोव्हीड सेंटरला ‘माँ अहिल्या कोविड केयर सेंटर’ असे नाव देण्यात आले आहे.
३. यात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा नेमका काय सहभाग आहे?
‘द क्विंट‘ ने मालवा विभागाचे संघ प्रचार प्रमुख विजय दीक्षित यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट केले की “इंदौरचे कोव्हीड सेंटर (indore covid center) प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. त्यासाठी काही संस्था आणि उद्योगपतींनी मदत केली आहे. रा.स्व.संघाचे स्वयंसेवक सुद्धा यात सेवा देत आहेत परंतु संघाने या कोव्हीड सेंटरसाठी निधी दिल्याचे दावे चुकीचे आहेत.”
४. ‘राधा स्वामी सत्संग ब्यास’ काय आहे?
ही एक मूलतः पंजाबमधील अध्यात्मिक संस्था आहे. ना नफा तत्वावर चालत असलेल्या या संस्थेचे इतर कुठल्याही राजकीय किंवा व्यावसायिक संस्थेशी संबंध नाही. असे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सांगण्यात आले आहे. त्यांच्या वेबसाईट किंवा इतर कुठल्याही अधिकृत सोशल मिडिया पेजवर त्यांचा संघाशी थेट कुठला संबंध असल्याचे नमूद नाही.
५. मुख्यमंत्री शिवराज चौहान संघाचा उल्लेख करत नाहीत
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सदर कोव्हीड सेंटरबद्दल केलेल्या ट्विटमध्ये कुठेही संघाचा उल्लेख नाही. यातही त्यांनी प्रशासन आणि ‘राधास्वामी सत्संग ब्यास’ एवढाच उल्लेख केलाय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंदौर मध्ये ६००० बेड्सचे कोव्हीड सेंटर उभारले सांगणारे दावे फेक आहेत.
इंदौर मधील कोविड सेंटर प्रशासनाने शहरातील अनेक उद्योजक आणि इतर संस्थांच्या मदतीने उभारले आहे. यासाठीची जागा ‘राधास्वामी सत्संग ब्यास’ या अध्यात्मिक संस्थेने दिलेली आहे.
संघाचे काही स्वयंसेवक येथे सेवा देत आहेत या व्यतिरिक्त संघाचा आर्थिक सहभाग नाही.
तसेच काही व्हायरल दाव्यात वापरलेली इमेज अरब राष्ट्रांमधील एक असणाऱ्या कतार देशातील ‘अल बायत’ या फुटबॉल स्टेडियमचे ते फोटो आहेत.
हे ही वाचा: संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकरांनी तरुणासाठी बेड सोडल्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ ‘कॉपी पेस्ट’ पत्रकारिता!
[…] […]