Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या कामासाठी सक्तीने लस घेतल्यामुळे ७०६ शिक्षकांचा मृत्यू? वाचा सत्य!

उत्तर प्रदेशात निवडणूक कर्मचारी म्हणून काम केलेल्या शिक्षकांना लसीकरण (corona vaccination) बंधनकारक होते. याचाच परिणाम होऊन तब्बल ७०६ शिक्षकांना आपला प्राण गमवावा लागलाय असे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

काय आहे व्हायरल मेसेज?

फक्त एका उत्तर प्रदेश राज्यात निवडणुकीचे काम करणाऱ्या बंधनकारक लस घेतलेल्या ७०६ शिक्षकांचा मृत्यू दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत महिन्याभरात झाला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या लसीकरणासाठीच्या वैश्विक आघाडी कार्यक्रमाचे संचालक व मुख्य वैज्ञानिक डाॅ. ग्रीट बाॅश व इतर प्रत्यक्ष संशोधन करणारे सर्वोच्च संशोधक जे म्हणतात ते पाहिले तर उत्तर प्रदेशातील बंधनकारक लस घेतलेल्या शिक्षकांचे मृत्यू लसीकरणामुळे होत आहेत असे लक्षात येते. परंतु ते कोरोनाच्या साथीमुळे होत आहेत असा राजकारणी आणि शिक्षक सघटनांचाही गैरसमज दिसतो.

या लसीकरणामुळे अधिक ताकदवान विषाणू तयार होतील व यातुन मानवजात पुसली जाणे शक्य आहे , ही भयंकर गोष्ट घडणार आहे ज्याची आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांना चिंता नव्हे खात्री वाटते.
अत्यंत धोकादायक बाब ही की या मृत्यूंना कोरोनाची साथ कारण आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला जाऊन प्राणघातक लस टोचणी, रेमडेसिविर सारखी औषधे, मास्क सारख्या शरीरातील प्राणवायू कमी करणाऱ्या गोष्टी जोरात रेटल्या जात आहेत.
कृपया सर्वत्र पाठवा. https://m.facebook.com/story.php?story_fbid=290066916039736&id=100051092899107
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ज्ञानेश मगर यांनी सदर मेसेज व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि सत्यतेच्या पडताळणीची विनंती केली. व्हायरल मेसेजमध्ये असलेल्या फेसबुक लिंकवर गेल्यानंतर हा मूळ दावा ‘भारतीय जीवन पृथ्वीरक्षण चळवळ‘ नावाच्या फेसबुक पेजवरून करण्यात आल्याचे समजते.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची केलेली मुद्देसूदपणे पडताळणी पुढीलप्रमाणे-

१. डॉ. ग्रीट बॉश यांचा संयुक्त राष्ट्राशी काहीएक संबंध नाही

व्हायरल पोस्टमधील दावा ज्या डॉ. ग्रीट बॉश यांच्या हवाल्याने केला जातोय ते बेल्जियम देशातील स्वतंत्र संशोधक आहेत. त्यांची लिंक्डइन प्रोफाईल पाहिल्यास लक्षात येईल की त्यांनी कुठेही आपण कसल्याही प्रकारे सयुंक्त राष्ट्राशी संबंधित असल्याचा उल्लेख केलेला नाही.

डॉ. बॉश चर्चेत येण्यामागे त्यांचे WHO ला उद्देशून लिहिलेले एक खुले पत्र आहे. जी WHO स्वतः संयुक्त राष्ट्र संघाची संस्था आहे. त्यातच वरिष्ठ पदावर असणाऱ्या व्यक्तीला खुले पत्र लिहिण्याची गरज का पडेल हा साधा तर्क लक्षात आल्यासच समजेल की यांचा संयुक्त राष्ट्राशी संबंध नाही.

२. काय आहे डॉ. ग्रीट बॉश यांचा दावा आणि याचे सत्य?

डॉ. ग्रीट बॉश यांनी WHO ला उद्देशून लिहिलेले एक खुले पत्र विविध माध्यमांतून फिरत आहे, तसेच त्यांनी विविध ठिकाणी मुलाखतींत केलेल्या वक्तव्यातून ते लसीकरणाच्या (corona vaccination) विरोधात असल्याचे दिसते. त्यांच्यामते लसीकरणामुळे मूळ प्रतिकारशक्ती कमी होईल. अशा सरसकट लसीकरणाने संपूर्ण मानवजात धोक्यात येईल.

AFP म्हणजेच Agency France Press आणि BBC या आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीने बॉश यांच्या विविध दाव्यांविषयी तज्ज्ञांची मते जाणून घेतली आणि त्यातून बॉश यांचे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.

अपेक्स बॉडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या CDC, Health Canada, WHO आणि आपली ICMR यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी लसीकरण (corona vaccination) हाच पर्याय असल्याचे सांगितले आहे.

३. उत्तर प्रदेशातील शिक्षकांचे लसीकरण झालेच नव्हते

व्हायरल पोस्टचा दावा ज्या गृहितकावर अवलंबून आहे, तेच मुळात चुकीचं आहे.

निवडणूक कर्मचारी असल्यामुळे सर्व शिक्षकांना सक्तीने लस देण्यात आली म्हणूनच त्यांचा मृत्यू झाला असा दावा या पोस्टचा आहे. परंतु स्वतः शिक्षक संघटनेने आयोगाला लिहिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की देशात एवढा हाहाकार चालू असताना राज्यात पंचायत निवडणूका ठेवल्या आणि त्यासाठी शिक्षक कर्मचार्यांना कामाचे आदेश दिले. परंतु त्यासाठी ना लसीकरण केले गेले ना त्यांच्या सुरक्षेची इतर काळजी घेतली. त्यामुळेच काम संपवून आलेल्या अनेक शिक्षकांचे कोरोना संक्रमणाने निधन झाले आहे. याविषयीची संपूर्ण बातमी ‘येथे‘ वाचू शकता.

४. दावा खरा ठरवण्यासाठी वापरलेली बातमी असंबंध

व्हायरल पोस्टमध्ये निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण केले आहे, असे सांगणाऱ्या NDTV च्या बातमीची लिंक आहे. वस्तुतः ही बातमी उत्तर प्रदेशात झालेल्या पंचायत निवडणुकांसंबंधी नसून आसाम, तमिळनाडू, प.बंगाल केरळ आणि पदुच्चेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी संबंधीची आहे.

Source: NDTV

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या कामासाठी सक्तीने लस घेतल्यामुळे ७०६ शिक्षकांचा मृत्यू झाल्याचा दावा करणारी व्हायरल पोस्ट फेक असल्याचे स्पष्ट झाले.

तज्ज्ञांच्या मते लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल असे नव्हे परंतु संसर्ग झाल्यास गंभीर प्रकृती होण्याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे मृत्यू टाळला जाऊ शकतो. म्हणूनच लसीकरण महत्वाचे आहे.

हे ही वाचा: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकाच्या बँक खात्यावरील विम्याचे २ लाख मिळणार? वाचा सत्य!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा