सोशल मीडियावर सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा एक जुना फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की फोटोत सोनिया गांधी यांच्या बरोबर दिसणारी व्यक्ती इटलीचे व्यापारी ओट्टाविया क्वात्रोची (Ottavio Quattrocchi) आहे.
प्रामुख्याने भाजपशी संबंधित सोशल मीडिया युजर्सकडून हा फोटो अतिशय थिल्लर आणि हिडीस दर्जाच्या कमेंट्ससह शेअर केला जातोय. शिवाय कॅप्शनमध्ये राहुल गांधींचा उल्लेख देखील राहुल खान असा करण्यात येतोय.
फेसबुकवर देखील हाच फोटो कॉपीपेस्ट दाव्यांसह मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो नेमका कधीचा हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वेबसाईटवर ४ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध फोटो फिचरमध्ये हा फोटो बघायला मिळाला.
फोटोच्या कॅप्शननुसार हा फोटो ८ एप्रिल १९९६ रोजी घेण्यात आला असून तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या आपला मुलगा राहुल बरोबर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी हा फोटो घेण्यात आला होता.
फोटोच्या क्रेडिटनुसार पीटीआय या वृत्तसंस्थेच्या फोटोग्राफरने हा फोटो घेतलेला आहे.
कोण होता ओट्टाविया क्वात्रोची?
ओट्टाविया क्वात्रोची हा इटलीतील उद्योगपती होता. क्वात्रोचीवर बोफोर्स घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप होता. 1999 साली बोफोर्स प्रकरणात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात क्वात्रोचीचे नाव होते.
2007 साली अर्जेंटिनाच्या पोलिसांनी इंटरपोलच्या वॉरंटवर क्वात्रोचीला अटक केली होती. मात्र, भारताकडे प्रत्यर्पण होऊ शकले नाही. जुलै 2013 मध्ये इटलीतील मिलान शहरात क्वात्रोचीचं निधन झालं.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल फोटोत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या बरोबर दिसणारी व्यक्ती बोफोर्स प्रकरणातील आरोपी ओट्टाविया क्वात्रोची (Ottavio Quattrocchi) नसून राहुल गांधीच आहेत. सोशल मीडियावरील दावे चुकीचे आहेत.
हे ही वाचा- सोनिया गांधींनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी एक रुपयाच्या नाण्यावर अधिकचे चिन्ह छापलेले?
Be First to Comment