Press "Enter" to skip to content

ठाकरे सरकारद्वारे शालेय शिक्षणाचे इस्लामीकरण केले जात असल्याचे सांगणारा व्हिडीओ दिशाभूल करणारा! वाचा सत्य!

‘सिराज ‘उद्धो’लाची हरित क्रांती!, सल्तनत-ए-उद्धवच्या राजवटीत शालेय शिक्षणाचे झपाट्याने इस्लामीकरण!’ अशा प्रकारच्या कॅप्शनसह चौथीच्या बालभारती पुस्तकातील एका धड्याचा दाखला देणारा 1.35 मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement

फेसबुकवर ‘फशिवसेना’ नावाच्या पेजवर अपलोड करण्यात आलेल्या हा व्हिडीओ बातमी करेपर्यंत 17 हजार लोकांनी बघितला असून 401 जणांनी शेअर केला आहे.

ट्विटरवरही हे दावे व्हायरल होताना दिसत आहेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक उत्तरा गणेश, निशिकांत गोळे आणि सुनील गिरकर यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित पाहिला. त्यामध्ये उल्लेख केलेले ‘इयत्ता चौथी मराठी बालभारती’चे पाठ्यपुस्तक मिळविले आणि शहानिशा केली. व्हिडीओमध्ये उल्लेख असलेला पाठ 9 व्या क्रमांकाचा, पान नंबर 27 वरील ‘ईदगाह’ असून त्यामध्ये रमजान महिन्यानंतर तीस दिवसांनी येणाऱ्या ईदच्या दिवशी घडलेल्या एका गोष्टीचा उल्लेख आहे आणि त्यास अनुसरून काही प्रश्न सुद्धा आहेत. येथपर्यंत व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीने सांगितलेली माहिती अचूक आहे.

हिंदू विद्यार्थांना मुस्लीम शिक्षण?

व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती पुढे असे सांगतोय की मुस्लीम शाळांमध्ये (मदरशांमध्ये) त्यांच्या धर्माचे शिक्षण देतात, मग आपल्या मुलांना त्यांचे शिक्षण कशासाठी?

हे पाठ्यपुस्तक शिकविले जाते ती शाळा सर्वधर्मीयांची शाळा आहे. येथे सामाजिक मुल्ये शिकविली जातात धार्मिक बाबी नव्हे. पुस्तकाच्या पहिल्या पानावरच भारतीय संविधानाची उद्देशिका आहे. यामध्येही ‘धर्मनिरपेक्ष’ असा शब्द आहे. याचाच अर्थ असा की सदर व्यक्तीची मुलगी ‘हिंदू शाळेत’नव्हे तर शासन पुरस्कृत शाळेत शिकते. जेथे परिपाठाला सरस्वती स्तवन गायले जाते, इंग्रजीच्या कवितेत सांताक्लॉजची ओळख होते, मराठीच्या ‘ईदगाह’ पाठातून ईद आणि रमजानविषयी माहिती मिळते. सामाजिक शास्त्रांमध्ये विविध धर्म, त्यांचे धर्म ग्रंथ, धर्मस्थळे याविषयी माहिती मिळते. म्हणजेच या अभ्यासक्रमावर कोणत्याच एका धर्माचे अधिकार असत नाहीत, ते ‘सर्वधर्म समानता’ मूल्य रुजवत असतात.

याच पुस्तकात संतवाणीमध्ये संत तुकाराम आणि संत चोखामेळा यांचे अभंग आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ‘या भारतात बंधुभाव नित्य असू दे’ असे गीत आहे. याचा अर्थ ‘हे हिंदू धर्माचे पुस्तक आहे’ अशी ओरड इतर धर्मियांनी करणे उचित ठरेल का? नक्कीच नाही.

पाठाचे लेखक मुस्लीम?

याहून महत्वाचे म्हणजे हा ‘ईदगाह’ धडा प्रसिद्ध हिंदी लेखक ‘प्रेमचंद’ (Premchand)यांनी लिहिलेला असून त्याचा मराठी अनुवाद संजीवनी खेर (Sanjivani Kher) यांनी केलाय. ही दोन्ही नावे हिंदूच आहेत. तसेच या पाठात एका आजी आणि नातवाच्या नात्याची अतिशय संवेदनशील गोष्ट आहे, यामध्ये कुठेही मुस्लीम संस्कृतीचे उदात्तीकरण करण्याचा अभिनिवेश नाही. सदर धडा वाचण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.

हे पाठ्यपुस्तक उद्धव ठाकरे सरकारने निर्मिले नाही:

पाठ्यपुस्तकाची पहिली काही पाने जर पाहिली तर लक्षात येईल की याची प्रस्तावना 31 मार्च 2014 रोजी लिहिली गेलीय. पुस्तकाची प्रथम आवृत्ती 2014 साली आलीय आणि तिसरे पुनर्मुद्रण 2017 साली झालेय.

Prastavana and Book Printing details
Source: anyflip

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शपथ घेतली. याचाच अर्थ सदर पाठ्यपुस्तकाची निर्मिती भाजप सरकार येण्याआधीच राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडी सरकारच्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात झालीय आणि त्याचे पुनर्मुद्रण ऑक्टोबर २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस मुखमंत्री असताना भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहे. धर्मनिरपेक्ष देशात शालेय अभ्यासक्रमात सर्वधर्मांच्याच बाबतीत माहिती दिली जाते. शासकीय शाळा ‘हिंदू शाळा’ नसतात.

प्रसिद्ध हिंदी लेखक प्रेमचंद यांच्या ईदगाह पाठाच्या अनुषंगाने जे आरोप होत आहेत. या पाठ्यपुस्तकाची निर्मिती आणि 3 वेळा पुनर्मुद्रणं महाविकास आघाडीचे म्हणजेच उद्धव ठाकरे सरकार स्थापन होण्याअगोदरच झालेली आहेत.

हेही वाचा: ठाकरे सरकारने आठवीच्या पुस्तकात भगतसिंह, राजगुरू यांच्यासोबत सुखदेव यांचे नाव न लिहिता कुर्बान हुसेन असे नाव लिहिलेय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा