Press "Enter" to skip to content

नेहरूंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी प्रियंका गांधींच्या ट्विटशी छेडछाड!

सोशल मीडियावर कथितरित्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या एका ट्विटचा (Priyanka gandhi on nehru) स्क्रिनशॉट शेअर केला जातोय. या ट्विटच्या आधारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

काय आहे ट्विट?

सोशल मीडियावरील व्हायरल ट्विटचा मराठी अनुवाद- “माझ्या आजोबांशी संबंधित माझी आवडती आठवण ते देशाचे पंतप्रधान असतानाची आहे. एकदा ते रात्री तीन वाजता काम संपवून परतले आणि बघतात तर त्यांचा बॉडीगार्ड थकून त्यांच्या बेडवर झोपला होता. त्यांनी त्याला ब्लँकेटने झाकले आणि त्याच्या पत्नीबरोबर झोपण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेले. 

Advertisement

ट्विटर युजर सदानंद घोडगेरीकर यांनी हा स्क्रिनशॉट शेअर केलाय. घोडगेरीकर यांच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे.  

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुकवर देखील अनेकांकडून हाच स्क्रिनशॉट शेअर केला जातोय.

पडताळणी:

व्हायरल स्क्रिनशॉट नुसार प्रियंका गांधी यांचं हे कथित ट्विट १४ नोव्हेंबर २०१९ रोजीचं असल्याचं दिसतंय. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम प्रियंका गांधी यांनी गेल्या वर्षी जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी (Priyanka gandhi on nehru) कुठलं ट्विट केलं होतं का, ते शोधण्याचा प्रयत्न केला.

प्रियंका गांधी यांच्या अकाऊंटवरून १४ नोव्हेंबर २०१९ रोजी म्हणजेच गतवर्षीच्या नेहरू जयंतीच्या औचित्यावर करण्यात आलेलं ट्विट आम्हाला मिळालं. यात प्रियंका गांधींनी जवाहरलाल नेहरूंविषयीची आठवण सांगितली आहे. या ट्विटचं शेवटचं वाक्य मात्र वेगळं आहे. 

या ट्विटमध्ये प्रियंका गांधी म्हणतात, “माझ्या आजोबांशी संबंधित माझी आवडती आठवण ते देशाचे पंतप्रधान असतानाची आहे. एकदा ते रात्री तीन वाजता काम संपवून परतले आणि बघतात तर त्यांचा बॉडीगार्ड थकून त्यांच्या बेडवर झोपला होता. त्यांनी त्याला ब्लँकेटने झाकले आणि बाजूच्या खुर्चीवरच झोपून गेले”

प्रियंका गांधींच्या ट्विटवरून स्पष्ट झालं की मूळ ट्विटमधील शेवटच्या ओळीत बदल करण्यात आला आहे.  “त्यांनी त्याला ब्लँकेटने झाकले आणि त्याच्याच बाजूला खुर्चीवरच झोपून गेले” या ओळीशी छेडछाड करून त्या ऐवजी “त्यांनी त्याला ब्लँकेटने झाकले आणि त्याच्या पत्नीबरोबर झोपण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेले.” ही ओळ जोडण्यात आली आहे.

प्रियंका गांधी यांच्या याच ट्विटच्या संदर्भात १४ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘दैनिक सामना’ मध्ये ‘जेव्हा नेहरूंच्या बेडवर अंगरक्षक झोपला, प्रियंका गांधींनी सांगितला किस्सा’ या मथळ्याखाली प्रकाशित बातमी देखील मिळाली. या बातमीत देखील या किस्स्याचे वर्णन आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या नावे फिरविण्यात येत असलेल्या ट्विटमधील शेवटच्या वाक्याशी छेडछाड करण्यात आली असून या माध्यमातून जवाहरलाल नेहरू यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला जातोय.

हे ही वाचा- काँग्रेस नेत्यांनी तुरुंगात भगतसिंगांची भेट न घेतल्याच्या दाव्यात किती तथ्य?

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

× न्यूज अपडेट्स मिळवा