अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता जवळपास २ महिने होताहेत. मात्र या प्रकरणात रोजच नवनवीन कॉन्स्पिरसी थिअरीज जन्माला घातल्या जाताहेत. मोठ्या प्रमाणात मीडिया ट्रायल देखील सुरु आहे.
सध्या सोशल मीडियात दावा केला जातोय की सुशांत सिंह राजपूत, सुशांतच्या आत्महत्येच्या साधारणतः ८ दिवसांपूर्वीच आत्महत्या केलेली सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन आणि २०१३ साली आत्महत्या केलेली अभिनेत्री जिया खान यांची हत्या करण्यात आली असून त्यामध्ये एकच गॅंग कार्यरत आहे.
सोशल मीडियात अभिनेता सुरज पांचोली याच्यावर या प्रकरणी दोषारोप ठेवण्यात येताहेत. सुरज पांचोलीचा एका पार्टीतील एका तरुणी सोबतचा फोटो शेअर करण्यात येत असून दावा करण्यात येतोय की तरुणी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सलिअन (sooraj pancholi and disha) आहे.
पडताळणी:
व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम हा फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला, परंतु त्यासंदर्भात कुठलीही विश्वासार्ह माहिती मिळाली नाही. मात्र त्यानंतर गुगलवर sooraj pancholi and disha या किवर्डससह सर्च केलं असता आम्हाला अनेक मीडिया रिपोर्ट्स मिळाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सुरज पांचोलीने इंस्टाग्राम पोस्ट टाकून ती तरुणी दिशा सालियन नसल्याचं स्पष्ट केलंय. सुरज पांचोलीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून म्हटलंय की संबंधित फोटो २०१६ सालचा असून फोटोतील तरुणी दिशा सालियन नसून आपली मैत्रीण अनुश्री गौर आहे, जी भारतात राहत देखील नाही.
सुरज पांचोलीच्या सांगण्यावरून या गोष्टीवर कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो परंतु सुरज पांचोलीच्या या पोस्टवर अनुश्री गौर हिने देखील रिप्लाय दिलेला आहे. खरी माहिती समोर आणल्याबद्दल धन्यवाद, अशी कॉमेंट अनुश्री हिने सुरज पांचोलीच्या पोस्टवर केलीये.
त्यानंतर आम्ही अनुश्री गौर हिच्या इंस्टाग्राम अकाउंटला भेट दिली, त्यावेळी आम्हाला ८ नोव्हेंबर २०१६ रोजीची इंस्टाग्राम पोस्ट मिळाली. ज्यात अनुश्री गौर आणि सुरज पांचोली एकमेकांसोबत दिसताहेत. व्हायरल फोटोत दिसणारी तरुणी आणि अनुश्री गौर यांचा फोटो एकमेकांशी तंतोतंत जुळणारा आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत सूरज पांचोली बरोबर दिसणारी ‘ती’ तरुणी सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सलिअन नसून, सुरज पांचोलीची मैत्रीण अनुश्री गौर आहे.
हेही वाच: सुशांतची ‘सुसाईड नोट’ सापडल्याचं सांगत युट्युबर्सने दिल्या खोट्या बातम्या
[…] […]