Press "Enter" to skip to content

‘तो काश्मिरी मुलगा CRPF च्या जवानाला दगड मारण्यासाठी चाललाय’ म्हणत व्हायरल होतोय फोटो!

अलीकडे एक मृतदेह, पलीकडे पाठमोरा छोटासा तीन-चार वर्षांचा काश्मिरी मुलगा आणि समोर CRPF चा जवान असा एक फोटो व्हायरल होतोय.

त्यासोबत कॅप्शन मध्ये लिहिलं जातंय, ‘कृपया लक्ष द्या, काश्मिरमध्ये जवानांनी आजोबाला मारल्याचं पाहून हा छोटा मुलगा हातात दगड घेऊन आहे. कुणी तर्क लाऊ शकतं याचं टार्गेट कोण असेल आता? का त्याने दगड उचलला असेल?’

बरखा दत्त यांच्या ट्विटवर एक ट्विटर युजर हेच फोटो शेअर करून विचारतोय ‘यांच्याबद्दल काय मॅडम? भारतीय मिडिया यावर का नाही सिरीयस चर्चा करत? हा मुलगा हातात दगड घेऊन आहे हे पाहुन मला पॅलेस्टाईन मध्ये रणगाड्या समोर दगड घेऊन उभा असलेला मुलगा आठवतोय.’

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने कीवर्ड्सच्या आधारे शोधाशोध केली तेव्हा राष्ट्रीय मीडियात गाजलेली एक बातमी समोर आली.

१ जुलैच्या NDTVच्या बातमीत असे म्हंटले आहे की ‘जम्मू काश्मिर मधील सोपोर मध्ये CRPF आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. यावेळी एक छोटा मुलगा त्याच्या आजोबांसोबत कारमध्ये चालले होते. अतिरेक्यांच्या गोळीबारातून वाचण्यासाठी आजोबा नातवासह गाडीतून उतरून सुरक्षित ठिकाणी जात असताना अतिरेक्यांची गोळी त्यांना लागली आणि ते जागीच मृत झाले.

रस्त्यावर आजोबा पडलेले असताना तो छोटासा नातू त्यांच्या छातीवर बसून रडत होता, त्यांना उठवत होता. त्यानंतर CRPF जवानाने त्या मुलाला त्या ठिकाणाहून सुरक्षित बाजूला घेतले.’

या घटनेला त्या लहान मुलाचे कुटुंब आणि काश्मीर मधील नेते वेगळ्या दृष्टीने पहात असा आरोप करत आहेत की मुलाच्या आजोबांना अतिरेक्यांनी नव्हे तर CRPF ने मारले आहे. गोळीबार चालू होता तर गाडीवर गोळ्यांचे निशाण कसे नाहीत.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की ‘वर्दीतल्या माणसाने त्या मुलाला वाचवलंय ते अगदी अपेक्षित कार्य आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारीच आहोत पण आम्हाला त्यांच्याकडून अजून चांगुलपणाची अपेक्षा आहे. तीन वर्षाच्या मुलाचे फोटोज काढून ते काय साध्य करत आहेत? हा तर प्रोपगंडा झाला. यातून त्यांना ‘आम्ही चांगले, ते वाईट’ असाच मेसेज द्यायचा आहे.’

ओमर यांच्यासह इतरही नेत्यांचे आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचे म्हणणे ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीत आहे.

हे असे आरोप प्रत्यारोप, CRPF चं स्पष्टीकरण विविध पेपर्स चॅनल्समध्ये आलेलं आहे. परंतु घटनेच्या वेळी काढेलेले विविध फोटोज आम्ही तपासले तेव्हा हे लक्षात आलं की त्या मुलाच्या हातात काहीच नाही. त्याच्या हातात दगड असल्याचा जो भास होतोय तो मुलाच्या जवळ असणाऱ्या मोठ्या दगडांचा आकार आहे. फोटोज ब्लर असल्याने हा भास होत आहे.

Kashmiri boy with stone for CRPF factcheck
Source: Twitter

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये सोपोर मधील घटनेचा हा फोटो असल्याचे समोर आले. सोबतच वेगवेगळ्या फोटोजचं आम्ही निरीक्षण केलं तेव्हा हे लक्षात आलं की त्या मुलाच्या हातात दगड नसून तो समोर असणाऱ्या मोठ्या दगडाच्या आकारामुळे निर्माण झालेला भास आहे.

त्यामुळे त्या काश्मिरी मुलाच्या हातात दगड असून तो CRPF च्या जवानाला मारायला निघाला आहे म्हणणाऱ्यांचे दावे फेक आहेत.

हेही वाचा: केरळात हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी अटक झाली; पण अमजद अली, तमीम शेख यांना नाही !

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा