Press "Enter" to skip to content

सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिला चक्क फेक गोष्टीचा दाखला

सुप्रीम कोर्टात २८ मे रोजी देशभरातील स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नासंदर्भातील सूओ-मोटो खटल्यावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडली. न्यायपालिकेसंबधी बातम्या व माहिती देणाऱ्या ‘लाइव्ह लॉ’ या न्यूज पोर्टलवर  या सुनावणी दरम्यानच्या कार्यवाहीची बारकाव्यांसह माहिती देणारा रिपोर्ट उपलब्ध आहे.

बाजू मांडताना तुषार मेहता काय म्हणाले?

“केंद्र सरकार कोव्हीड१९ रोखण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. पण फक्त नकारात्मकता पसरवण्याचं काम करणारे काही लोक निवांतपणे बसून फक्त तत्वज्ञान पाजळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी देश करत असलेले प्रयत्न या लोकांना दिसत नाहीत.”

हे सांगताना त्यांनी एका गोष्टीचा दाखला दिला,

“१९८३ मध्ये एक फोटोग्राफर सुदानला गेला होता. तिथे एक घाबरलेल्या अवस्थेतील मुल होतं. ते मुल मरण्याची वाट पहात बसलेलं. तिथे एक गिधाड सुद्धा होतं. फोटोग्राफरने फोटो काढला आणि तो फोटो ‘न्यूयॉर्क टाईम्स’ मध्ये प्रसिद्ध झाला. या फोटोसाठी फोटोग्राफरला पुलित्झर सन्मान मिळाला होता. त्यानंतर ४ महिन्यांनी फोटोग्राफरने आत्महत्या केली.”

पुढे तुषार मेहता यांनी असं सांगितलं की, “फोटोग्राफरला एका पत्रकाराने त्या बाळाचं काय झालं असा प्रश्न विचारला. उत्तर देताना फोटोग्राफर म्हणाला, मला माहित नाही, मला लगेच घरी यायचं होतं. मग पत्रकाराने विचारलं तिथे किती गिधाडे होती? त्याने सांगितलं एक. पत्रकार म्हणाला- नाही, तिथे दोन गिधाडे होती. एकाने कॅमेरा हातात धरला होता.”

पडताळणी:

ही गोष्ट सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांच्याही आधी अनेकांनी वाचली होती. कारण ही गोष्ट सोशल मीडियात खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली. विशेष म्हणजे गोष्ट व्हायरल होण्यासाठी भाषेचं बंधन राहिलं नाही. मराठीत जी गोष्ट व्हायरल झाली तीच इंग्रजीत सुद्धा झालीये.

हे पहा:

त्या गोष्टीची ‘चेकपोस्ट मराठी’ने २७ मे २०२० रोजीच पडताळणी केली होती. त्या गोष्टीची सविस्तर पडताळणी तुम्ही ‘येथे’ वाचू शकता.

मराठी काय आणि इंग्रजीत काय दोन्हीही गोष्टी फेक आहेत.

वस्तुस्थिती:

आमच्या त्या पडताळणीमध्ये काय वस्तुस्थिती समोर आलेली?

  • होय, हे खरंय की ‘“द व्हलचर अँड द लिटल गर्ल’चा फोटोग्राफर केविन कार्टरला पुलित्झर मिळालं होतं. हे सुद्धा खरंय की त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी आत्महत्या केली होती.
  • सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकार आणि केविनमध्ये असं काही संभाषण झालंच नव्हतं.
  • तिथे एक नव्हे दोन गिधाडं होती’ अशा अर्थाचं वाक्य फ्लोरिडाच्या ‘सेंट पिटसबर्ग टाईम्स’ने वापरलं होतं.
  • हे ही खरं नाही की केविनला वेळ नव्हता आणि त्याला विमान पकडायचं होतं म्हणून तो निघून गेला. वस्तुस्थिती अशी की त्या मुलीचं दुःख पाहून केविन तिथेच बसून रडला आणि दुसऱ्या दिवशी अजून काही फोटोज काढून माघारी परतला.
  • अर्थातच केविनने तो त्या फोटोतल्या मुलीसोबत जे वागला त्याचा पश्चाताप म्हणून नव्हे तर वैयक्तिक कारणांमधून आलेल्या नैराश्यातून हतबल होऊन त्याने आत्महत्या केली होती. त्यामुळे ‘तिथे एक नव्हे, दोन गिधाडे होती, असं ऐकून फोटोग्राफरने शरमेने आत्महत्या केली.’ असं सांगणारी व्हायरल गोष्ट फेक आहे.

याच फेक व्हायरल गोष्टीचा रेफरन्स सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बोलताना दिलाय.

पुराव्यांसह गोष्टीची पडताळणी वाचण्यासाठी क्लिक करा:

‘तिथे एक नव्हे, दोन गिधाडे होती, असं ऐकून फोटोग्राफरने शरमेने आत्महत्या केली.’ सांगणारी व्हायरल गोष्ट फेक

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा