Press "Enter" to skip to content

ज्ञानवापी मशिद- शिवलिंग संदर्भात फेकन्यूजचा सूळसुळाट! वाचा महत्वाच्या व्हायरल दाव्यांचे सत्य!

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिद (Gyanvapi Masjid) ही मूलतः हिंदू मंदिर असून यामध्ये शिवलिंग (Shivling) असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केलाय. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असले तरी दरम्यानच्या काळात सोशल मीडियात विविध शिवलिंगांचे फोटोज व्हायरल होत असून ते ज्ञानवापी मशिदीमधीलच असल्याचे दावे केले जात आहेत. अशाच काही सर्वाधिक व्हायरल झालेल्या दाव्यांच्या सत्यतेची पडताळणी:

१. व्हिएतनामचा फोटो ज्ञानवापी शिवलिंगाचा म्हणून व्हायरल!

दावा: ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग हाच सदर वास्तू मंदिर असल्याचा ठोस पुरावा असल्याचे सांगितले जातेय.

Advertisement

वस्तुस्थिती: व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च करून पाहिला असता २०२० साली केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Prahlad Singh Patel) यांच्या ऑफीशियल ट्विटर हँडलवरून केलेले ट्विट समोर आले. यानुसार व्हिएतनाममध्ये पुरातत्व खात्याच्या उत्खननात ७ मोठी मंदिरे सापडली. याच मंदिरांच्या फोटोजमध्ये आता व्हायरल होत असलेल्या शिवलिंगाचा फोटो आहे.

व्हिएतनाम प्लस या वृत्तपत्राने २८ मे २०२० रोजी उत्खननाविषयी बातमी दिलीय. त्यातही याच शिवलिंगाचा फोटो पहायला मिळतो. याचाच अर्थ असा की सदर शिवलिंग व्हिएतनाम देशातील असून त्याचा ज्ञानवापी मशीद-मंदिर वादाशी काहीएक संबंध नाही. व्हायरल दावे फेक आहेत.

२. ज्ञानवापी मशिदीकडे नंदीच्या मूर्तीचे मुख?

दावा: नंदीचे मुख सदैव शिवलिंगाकडे असते परंतु काशी विश्वनाथाच्या नंदीचे मुख ज्ञानवापी मशिदीकडे (Gyanvapi Masjid) आहे. याचाच अर्थ खरे पुरातन शिवलिंग मशिदीमध्येच आहे. असा दावा करत नंदीचा आणि मशिदीचा फोटो व्हायरल केला जातोय.

वस्तुस्थिती: ‘चेकपोस्ट मराठी’ने नंदीच्या व्हायरल फोटोस रिव्हर्स सर्च करून पाहिले असता सदर मूर्ती साताऱ्यातील वाईमध्ये असणाऱ्या मंदिरासमोरील तो नंदी असल्याचे समजले. वाई मध्ये काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. त्यासमोरील ही पुरातन दगडी नंदीची मूर्ती आहे. २०१३ साली युट्युबवर अपलोड केलेल्या एका व्हिडीओमध्ये आपण ही मूर्ती व्यवस्थित पाहू शकता.

Image Credit: Shutterstock Images
Source: Shutterstock Image

३. कोलकाता मशिदीतील कारंजा ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंग म्हणून व्हायरल!

दावा: ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग असल्याचा हिंदूसंघटनांचा दावा आहे तर, ज्यास शिवलिंग संबोधले जातेय तो कारंजा असल्याचा मुस्लीम धर्मियांचा दावा आहे. हिंदू संघटनांच्या दाव्याची खिल्ली उडविण्यासाठी काही मुस्लीम ट्विटर युजर्स ज्ञानवापी मशिदीतील (Gyanvapi Masjid) कारंज्याचा फोटो असल्याचे दावे करत हे शिवलिंग असल्याचा दावा भ्रामक असल्याचे सांगत आहेत.

Source: Twitter

वस्तुस्थिती: ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च केले असता तो कोलकात्याच्या नाखोडा मशिदीतील असल्याचे समोर आले.

Source: Wikipedia

अलामी आणि फ्लिकर या स्टॉक फोटो साईट्सवरही सादर फोटो कोलकाता नाखोडा मशिदीतील असल्याचेच दर्शविले आहे.

ज्ञानवापी मशीद की मंदिर? सत्य काय?

सदर वादावरून धार्मिक वातावरण चिघळूनये यासाठी न्यायालयाकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायधीशांच्या न्यायपीठाने सदर बाब वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाकडे सुपूर्द केली आहे. २० मे रोजी दिलेल्या या आदेशात जिल्हा न्यायालय ८ आठवड्यांत आपला निकाल जाहीर करेल असे सांगितले आहे. तोपर्यंत १७ मे रोजी झालेल्या सुनावणीतील आदेश अमलांत आणले जावेत. या आदेशात तीन महत्वाचे मुद्दे आहेत.

१. शिवलिंगचा दावा केलेल्या जागेस सुरक्षा प्रदान करण्यात यावी.
२. मुस्लीम समाजास नमाज पठण करण्यास मनाई करू नये.
३. केवळ २० लोकांना नमाज पठन करण्याचा आदेश रद्द केला असून संख्येचे बंधन नाही.

हे आदेश केवळ ८ आठवडेच लागू असतील, तोवर निकाल स्पष्ट होईल आणि सत्य समोर येईल अशी दोन्ही बाजूच्या गटांना आशा आहे.

हेही वाचा: तिरुवल्लुर येथील कडूनिंबाच्या मुळाशी शिवलिंग सापडल्याच्या घटनेचे रहस्य आले समोर!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा