सोशल मीडियावर सध्या निर्भया प्रकरणातील आरोपी ‘मोहोम्मद अफरोज’ला (mohammad afroz) फाशी देण्यासाठी कॅम्पेन चालवलं जातंय. २०१२ साली अल्पवयीन असणारा अफरोज आता सज्ञान झाला आहे. त्याला फाशी देण्यास आता कुणाची काहीच हरकत नसावी, असा दावा केला जातोय.
फेसबुकवर साधारणतः अशाच दाव्यांसह सोबत एक फोटो देखील शेअर केला जातोय. फोटोत दिसणारी व्यक्ती ‘मोहोम्मद अफरोज’ असल्याचं सांगण्यात येतंय.
पडताळणी:
सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याच्या आणि फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. त्यावेळी अनेक मीडिया रिपोर्ट्स मिळाले. या रिपोर्टनुसार व्हायरल फोटो निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याचा असल्याचे समजले.
लोकसत्ताच्या बातमीनुसार विनय शर्माला मार्च मध्येच फाशी झालेली आहे. विनय शर्मा बरोबरच प्रकरणातील इतर आरोपी मुकेश सिंग, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग यांना देखील २० मार्च २०२० रोजी फासावर लटकाविण्यात आलेलं आहे.
विनय शर्मा, मुकेश सिंग, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग ह्या चार आरोपींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद एक दिवस आधीच मेरठवरून दिल्लीच्या तिहार तुरूंगात पोहोचले होते. त्यांनी २० मार्च २०२० रोजी सकाळी ठीक ५.३० वाजता या आरोपींना फाशी दिली.
निर्भया प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलं होतं. या सहापैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने ट्रायल सुरु असतानाच तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.
प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची २०१५ साली ३ वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर सुधारगृहातून सुटका करण्यात आली होती. जुवेनाईल ऍक्टनुसार आरोपीचं नाव मात्र उघड करण्यात आलेलं नाही. शिवाय या प्रकरणातील इतर कुठल्याही आरोपीचं नाव ‘मोहोम्मद अफरोज’ (mohammad afroz) नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की निर्भया प्रकरणातील कुठल्याही आरोपीचे नाव ‘मोहोम्मद अफरोज’ नव्हते. सध्या व्हायरल होत असलेल्या दाव्यातील ‘मोहोम्मद अफरोज’ हे नाव पूर्णतः काल्पनिक आहे.
जुवेनाईल ऍक्टनुसार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे नाव जाहीर गुपित ठेवण्यात आलेले आहे. या आरोपीने आपली ३ वर्षांची सजा २०१५ साली पूर्ण केलेली आहे. सध्या ‘मोहोम्मद अफरोज’चा म्हणून व्हायरल करण्यात येत असलेला फोटो विनय शर्माचा असून त्याला पूर्वीच फाशी झालेली आहे.
हे ही वाचा- टँकरमधून महिला आणि बालकांची तस्करी चालू होती? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य!
Be First to Comment