Press "Enter" to skip to content

कापराच्या ‘या’ आयुर्वेदिक पोटलीच्या वासाने ऑक्सिजन लेव्हल वाढणार नाही, उलट जीवावर बेतेल!

कोरोना महामारीची दुसरी लाट सध्या आपण अनुभवत आहोत. ही लाट पहिलीपेक्षा अधिक भयंकर आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत, ऑक्सिजन कमी पडतोय. अशात ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी एका आयुर्वेदिक पोटलीच्या घरगुती उपायाचा स्क्रिनशॉट (smelling camphor for oxygen) सोशल मीडियात व्हायरल होताना दिसतोय.

Advertisement

पहा प्रयत्न करून 🙏🏻कापूर लवंग ओवा काही थेंब निलगिरी चे तेल.दिवस रात्र पोटली बनवून वास घ्या.ऑक्सिजन ची पातळी वाढण्यास…

Posted by Chhatrapati Shivaji Maharaj Park on Sunday, 18 April 2021

“कापूर, लवंग, अजवाईन म्हणजेच ओवा आणि काही थेंब निलगिरीचे तेल. दिवसभर रात्रभर पोटली बनवून वास घ्या. ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत करते. ऑक्सिजन पातळी कमी असते तेव्हा लडाखमधील पर्यटकांनाही ही पोटली दिली जाते. हा एक घरगुती उपचार आहे.”

अशा मजकुरासह एक फोटो त्या स्क्रिनशॉट मध्ये आहे. फोटोमध्ये दिलेल्या पदार्थांचे मिश्रण आणि कापराच्या वड्या पांढऱ्या कापडावर ठेवल्या आहेत. शेजारी अशा तीन पोटल्या सुद्धा बनवून ठेवल्या आहेत. हा स्क्रिनशॉट फेसबुकवर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Ayurvedic potli viral posts

व्हॉट्सऍप देखील यास अपवाद नाही. चेकपोस्ट मराठीचे वाचक उमेश परब आणि प्रवीण सागर यांनी सदर व्हायरल इमेज आम्हाला फॉरवर्ड करून पडताळणीची विनंती केली आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी काही आयुर्वेद तज्ज्ञांना संपर्क साधला. डॉ. श्रेया पावसे-देवरे यांनी सदर दाव्याचे खंडण केले असून त्या म्हणाल्या-

“या सल्ल्यात प्रमाण, मात्रा यांचा अभाव आहे. रुग्णाच्या एकूण हिस्ट्रीशिवाय कुठलाही आयुर्वेदाचार्य सरसकट औषधी सुचवत नाही. त्यामुळे असे घरगुती उपाय करणे टाळावे, त्यात कोव्हीड१९च्या काळात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलेही स्वतःहून उपाय करणे जीवावर बेतू शकते.”

– डॉ. श्रेया पावसे-देवरे (प्रकृती आयुर्वेद हॉस्पिटल, नाशिक)

आयुर्वेद वाचस्पती असणाऱ्या डॉ. परीक्षित शेवडे यांनीही आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या व्हायरल दाव्याचा फोलपणा समोर आणलाय. त्यामध्ये ते म्हणतायत,

“सावधान!!

खालील उपाय वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करण्याचा विचारही करू नका. एकतर या फोटोत दाखवलेला केमिकल कापूर औषधाकरता वापरला जात नाही. तिथे भीमसेनी कापूरच लागतो. दुसरे म्हणजे दम लागत असणाऱ्या व्यक्तींनी थोड्याही अधिक प्रमाणात हा कापूर हुंगल्यास त्यांचा दम अधिक वाढू शकतो! अल्प मात्रेत प्रसरण आणि त्यानंतर मात्र आकुंचन करणे हा कापराचा गुणधर्म आहे. व्हाट्सएप विद्यापीठाच्या सल्ल्यांपासून सावधान! “

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति

आधुनिक विज्ञान काय सांगत?

कापराचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे भीमसेनी कापूर आणि दुसरा मानवनिर्मित केमिकलयुक्त कापूर. आपण जो दुकानातून आणतो, गोल वड्या असणारा तो केमिकलयुक्त कापूर आहे. हा कापूर ‘टरपेनटाईन’ या रसायनापासून बनवला जातो. भीमसेनी कापूर हा झाडापासून मिळतो. हा कापूर खाण्यामध्ये सुद्धा वापरतात. याविषयी NDTVचा सविस्तर रिपोर्ट आहे.

कापराचा उपयोग विक्स सारख्या जेलमध्ये ४ ते ५ टक्के प्रमाणात केला जातो. त्याने चोंदलेले नाक मोकळे होण्यास थोडीफार मदत होते परंतु मूळ श्वसनासंबंधी समस्यांवर त्याचा फारसा उपयोग नाही असे २००९च्या एका रिसर्च पेपरमध्ये नमूद केले आहे. मुळात कोरोना विषाणू थेट फुप्पुसावर आघात करतो, म्हणूनच ऑक्सिजन घेण्यास त्रास होतो. कापराच्या उपयोगाने फुप्पुसाच्या त्रासावर काही ईलाज होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. केमिकलयुक्त कापराच्या वापराने अमेरिकेत २०१८ साली तब्बल ९५०० लोकांना विषबाधा झाली होती.

लवंग, ओवा आणि निलगिरी या पदार्थांच्या श्वसनरोग संबंधी उपायांवर पुरेसा रिसर्च झाल्याचे सापडले नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये कापूर, ओवा, लवंग आणि निलगिरी तेलाची पोटली हुंगल्याने (smelling camphor for oxygen) ऑक्सिजन लेव्हल वाढते हा दावा निराधार आणि अशास्त्रीय असल्याचे स्पष्ट झाले. हा उपाय कमी अपाय जास्त करू शकतो त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलंच बरं.

सर्दी, ताप, खोकला किंवा वास, चव न जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास; श्वसनास त्रास जाणवल्यास डॉक्टरांना संपर्क साधा इतर कुठलेही घरगुती उपाय करून वेळ व्यर्थ घालवू नये.

हे ही वाचा: पुदुच्चेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याचा कोरोनावरील घरगुती इलाज ‘WHO’ने स्वीकारल्याचा फेक दावा व्हायरल !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा