Press "Enter" to skip to content

शेतकरी आंदोलनातील भारतविरोधी म्हणून व्हायरल व्हिडिओ अमेरिका आणि पाकिस्तानातले!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळे व्हिडीओ बघायला मिळताहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तान आणि इमरान खान (Imran Khan) यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या जात आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भारताविरुद्ध युद्ध छेडून पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) धडा शिकविण्याची धमकी देतोय. दावा केला जातोय की हे दोन्हीही व्हिडीओज शेतकरी आंदोलनातील (Farmers Protests) असून या आंदोलनात भारतविरोधी कारस्थाने केली जाताहेत.

Advertisement
Source: whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संदीप इनामदार यांनी सदर व्हायरल दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

पहिला व्हिडीओ

पहिल्या व्हिडिओत ‘इमरान खान जिंदाबाद’, ‘पंजाब बनेगा पाकिस्तान’, ‘पंजाब बनेगा खालिस्तान’, ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’, ‘अल्लाहू अकबर’, ‘खालिस्तान जिंदाबाद’ आदी घोषणा दिल्या जाताहेत.

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्यासाठी रिव्हर्स सर्चची मदत घेतली असता ‘सियासत पीके’ या पाकिस्तानी मीडिया प्लॅटफॉर्मच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 9 डिसेंबर 2020 रोजी हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला असल्याचे आढळून आले. ट्विटच्या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ अमेरिकेतील असल्याचे सांगण्यात आले आहे. 

व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असता व्हिडिओत पाकिस्तानी झेंड्याव्यतिरिक्त अमेरिकेचे झेंडे देखील बघायला मिळतात. याआधारे किवर्ड सर्च केलं असता ‘अलजझीरा’चा रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टनुसार सदर व्हिडीओ अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील प्रदर्शनाचा आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयाबाहेर 74 व्या महासभेपूर्वी निषेध प्रदर्शने केली होती. काश्मीरच्या मानवी हक्कांच्या प्रश्नांबाबत ही निदर्शने करण्यात आली होती.

दुसरा व्हिडीओ

दुसऱ्या व्हिडिओतील व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देताना दिसतोय. तो म्हणतोय, “इमरान खान ने उन्हें इज्ज़त दी है, पाकिस्तान ने उन्हें इज्ज़त दी है… इंशाअल्लाह वे जंग में हमारे साथ होंगे. मोदी को सबक सिखाने का वक्त आ गया है. 45 करोड़ [वहां के लोग] और 20 करोड़ यहां हैं.. मोदी अब तेरी खैर नहीं. इंशाअल्लाह हिंदुओं का नामो निशान मिट जाएगा दुनिया से… ये बहुत बड़ा कारनामा है इमरान खान का.”

व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधल्या असता आम्हाला ANI या वृत्तसंस्थेच्या वेबसाईटवर १६ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार पाकिस्तानमधील ‘नया पाकिस्तान’ या युट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. कर्तारपूर कॉरिडॉर संदर्भातील चर्चेदरम्यान एका पाकिस्तानी नागरिकाने ही प्रतिक्रिया दिली होती.

‘नया पाकिस्तान’च्या युट्यूब चॅनेलवर देखील हा व्हिडीओ बघायला मिळतो. साधारणतः ११ मिनिटांच्या संपूर्ण व्हिडिओतील ३ मिनिटे ५८ सेकंदापासूनचा भाग सध्या व्हायरल होतोय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओजचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. दोन्हीही व्हिडीओज साधारणतः दोन वर्षांपूर्वीचे असून दोन्हीही व्हिडीओज भारतातले नाहीत. पहिला व्हिडीओ अमेरिकेतील प्रदर्शनाचा आहे, तर दुसरा व्हिडीओ पाकिस्तानमधील आहे.

हेही वाचा- दारू वाटपाचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनातील नाही, व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा