निवृत्त नौदल कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अमुक अमुक व्यक्तीस मारहाण केली सांगणारे विविध व्हिडीओज व्हायरल होत आहेत. असाच एक ‘आयडीबीआय’ बँक कर्मचाऱ्याला मारहाण (shivsena attacks idbi manager) करणाऱ्या लोकांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.
‘पोलिसांच्या समोर बँक कर्मचाऱ्याला शिवसेनेच्या गुंडांनी मारहाण केली.जय महाराष्ट्र’ अशा अर्थाचे कॅप्शन देऊन सदर व्हिडीओ व्हायरल होतोय. आपल्या बायो मध्ये ‘नमो नमो ओन्ली नमो, नमो फॉरएव्हर, नरेंद्र मोदिजींनी फॉलो बॅक करावं या प्रतीक्षेत.’ असे लिहिणाऱ्या ‘जगत दारक’ या ट्विटर युजरने सदर दाव्यासह व्हिडीओ ट्विट केलाय. यास जवळपास ३२ हजार व्ह्युव्ज आहेत आणि साधारण सव्वा दोन हजार पेक्षा जास्त लोकांनी रीट्विट केलेय.
पुण्यातील वडगावशेरी मतदार संघाचे भाजप अध्यक्ष सुनील नायर यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट करत मारहाण करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा दावा केलाय. या पोस्टला ६४ लोकांनी शेअर केले आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या किफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधून पाहिल्या तेव्हा दोन लोकल न्यूजच्या क्लिप्स आम्हाला मिळाल्या.
‘मेट्रो न्यूज’ या पोर्टलने आपल्या फेसबुकपेजवर सदर व्हिडीओ पोस्ट करत ही घटना बुलडाण्यातील मलकापूर येथील असून कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्षाने आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरला मारहाण केली असल्याचे म्हंटले आहे.
त्याच पद्धतीने ‘स्टार सेव्हन’ या युट्युब चॅनलवरही याविषयी बातमी प्रसारित करण्यात आली असून यातही सदर घटना बुलढाण्यातील मलकापूर येथेच घडली असल्याचा उल्लेख आहे.
मलकापूर युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी शिर्के, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष बंडू चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेत येऊन शेतकऱ्यांची कामे का करत नाही, पिक कर्ज वाटप का करत नाहीत असे प्रश्न विचारत पोलीस कर्मचाऱ्यासमोरच बँक कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती या व्हिडिओतून मिळते.
बँक मॅनेजर देविदास घाटे यांनी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित लोकांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. मारहाणीचा प्रकार मागील पंधरा दिवसांपूर्वीच घडला असल्याचेही बातमीत सांगितले आहे.
‘न्यूज १८ लोकमत’ने सुद्धा या संबंधी बातमी दिली असून या घटनेमागे मलकापूर तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारीच असल्याचे सांगितले आहे. या बातमीतही सदर घटना १५ दिवस जुनी असल्याचाच उल्लेख आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की सादर घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात घडलेली आहे. पोलिसांसमोर आयडीबीआय बँक मॅनेजरला मारहाण करणारे लोक कॉंग्रेसचे पदाधिकारी आहेत. यामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा (shivsena attacks idbi manager) काहीएक संबंध नाही.
हेही वाचा: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेले मदन शर्मा नौदल अधिकारी की मर्चंट नेव्ही कर्मचारी?
Be First to Comment