सोशल मीडियावर एक सेल्फी मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल सेल्फीमध्ये दोन वेगवेगळ्या रेल्वेमध्ये असलेले दोन व्यक्ती बघायला मिळताहेत. हे दोघे पिता-पुत्र असल्याचे सांगण्यात येतेय. रेल्वेतील टीसी मुलगा आणि गार्ड वडिलांच्या ट्रेन समोरासमोर आल्यानंतर घेण्यात आलेल्या या सेल्फीला सोशल मीडियावर ‘अजब-गजब’ सेल्फी म्हंटले जात आहे.
पत्रकार सुधीर कुमार पांडे यांनी ट्विट केलेला हा फोटो जवळपास 4400 पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय.
काही युजर्सकडून हा फोटो दक्षिण भारतातला असल्याचे सांगण्यात येतेय.
सोशल मीडियावर व्हायरल सेल्फी नेमका कुठला याविषयीची माहिती मात्र व्हायरल पोस्टमध्ये देण्यात आलेली नाही. ‘झी २४’च्या वेबसाईटवर देखील या व्हायरल सेल्फीविषयीची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र सेल्फी नेमका कुठला याविषयीची माहिती या बातमीत देखील बघायला मिळत नाही.
अनेकांडून सेल्फी नेमका कुठला आणि सेल्फीमधील पिता-पुत्रांची जोडी कोण याविषयी विचारणा करण्यात येत असल्याने आम्ही सेल्फीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला.
पडताळणी:
व्हायरल सेल्फी रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला R Tv News या बांग्लादेशी वेबसाईटवरील 15 मे 2019 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार हा सेल्फी बांगलादेशातील फुलबरी रेल्वे स्टेशनवरील आहे. वशिबूर रहमान शुवो यांनी हा सेल्फी घेतला होता.
बातमीनुसार वशिबूर रहमान शुवो हे रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत आहेत. एका दिवशी त्यांची रेल्वे फुलबरी रेल्वे स्थानकावर पोहोचली, तेव्हा त्यांना दुसऱ्या ट्रॅकवर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये गार्ड म्हणून कार्यरत असलेले आपले वडील दिसले. वशिबुर यांनी हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर बांग्लादेशमध्ये हा सेल्फी व्हायरल झाला होता.
वशिबूर रहमान शुवो यांनी स्वतः बांग्लादेश रेल्वेशी संबंधित एका ग्रुपवर हा सेल्फी पोस्ट केला होंता.
आम्ही फेसबुकच्या माध्यमातून शुवो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा सेल्फी आपणच घेतला असल्याची माहिती दिली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की व्हायरल सेल्फीमधील जोडी पिता-पुत्रांचीच आहे. फोटो दक्षिण भारतातील नसून बांगलादेशमधील आहे. वशिबूर रहमान शुवो या बांगलादेश रेल्वमध्ये टीसी म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने हा सेल्फी घेतला आहे.
हेही वाचा- तमिळनाडूच्या जंगलात वाफेच्या इंजिनाप्रमाणे धूर सोडणारी अनोखी वनस्पती आढळते? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment