Press "Enter" to skip to content

लहान मुलीला सुटकेसमध्ये घेऊन चाललेल्या अपहरणकर्त्याच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!

एका महिलेने संशयास्पद हालचालींवरून इसमास थांबवले, तिच्या मदतीला दोन तरुण गेले आणि त्यांनी त्या इसमाची सुटकेसची झडती घेतली. बॅग उघडली असता त्यात चक्क 5-6 वर्षांची छोटीशी मुलगी असल्याचे आढळले. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement

फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असलेला हा 5.2 मिनिटांचा व्हिडीओ ‘चेकपोस्ट मराठी’च्या अनेक वाचकांनी निदर्शनास आणून दिला आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने अशा प्रकारच्या व्हायरल व्हिडीओची या आधीही पडताळणी केली आहे. खरी घटना चालू होण्याअगोदरच शूट चालू करणे, अतिशय संथ गतीने रेंगाळत वेळ काढत हालचाल करणे ही लक्षणे पाहून सदर व्हिडीओ फेक असण्याची आम्हाला शंका आली. एवढ्याशा लहान मुलीचे अपहरण करून घेऊन चाललेला इसम रंगेहाथ सापडल्यावर लोक केवळ शूट करत न बसता अगोदर त्यावर हात साफ करून घेतील. ही स्वाभाविक प्रतिक्रिया न दिसता ते दोन युवक त्यास ओढत आहेत आणि तो अपहरणकर्ताही फार विरोध न करता त्यांच्यासोबत जातोय हे काहीसे न पटणारे होते.

म्हणूनच आम्ही सत्यतेची पडताळणी सुरु केली. विविध कीवर्ड्स टाकून शोधाशोध केली तेव्हा वर अपलोड केलेला युट्युब व्हिडीओ आम्हाला मिळाला. त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये एका व्यक्तीने सदर व्हिडीओ फेक असून ‘भारती प्रँक’ चॅनल चेक करा, ते पेज चालवणारा व्हिडीओमध्ये लाल टोपी घालून आहे अशी कमेंट केलेली आढळली.

हाच धागा पकडत आम्ही नव्याने शोधाशोध केली असता फेसबुकवर ‘राजू भारती’ या व्यक्तीच्या वॉलवर हाच व्हिडीओ सापडला. हा मूळ व्हिडीओ 6.13 मिनिटांचा आहे. याच्या कॅप्शनमध्ये सदर व्हिडीओ काल्पनिक असल्याचे लिहिले आहे. सामाजिक जागृतीकरिता हा व्हिडीओ बनविला असल्याचे त्यात नमूद केले आहे.

Source: Facebook

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की लहान मुलीला सुटकेसमध्ये घेऊन चाललेल्या अपहरणकर्त्याचा व्हायरल व्हिडीओ स्क्रिप्टेड, नाटकीय आणि बनावट आहे. या अशा फेक व्हिडीओजवर विश्वास ठेऊन, गावात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रीय झालीय असे सांगून अनेक निरपराध लोकांना जमावाचा त्रास सहन करावा लागला आहे, काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

हेही वाचा: टँकरमधून महिला आणि बालकांची चालू होती तस्करी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा