Press "Enter" to skip to content

मोदींची प्रतिमा जाळण्याच्या प्रयत्नात स्वतःच जळाला समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता? वाचा सत्य!

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने यश संपादित केल्यानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) समर्थकांनी विजयी मोर्चा काढला होता. या मोर्चाला सामोरे जाताना समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Nrendra Modi) प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्याला स्वतःलाच आग लागली असे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

‘बीजेपी रॅलीमध्ये मोदी चा फोटो जाळण्याचा प्रयत्न केला, समाजवादी पार्टीचा कार्यकर्ता स्वतःच जळाला.‘ अशा कॅप्शनसह १.४४ मिनिटांचा तो व्हिडीओ व्हायरल होतोय.

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक चंद्रकांत कापुरे यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणी करण्याची विंनती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ला व्हायरल व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेश विधान भवनाची इमारत (ज्यास लोक भवन असे संबोधतात) दिसत असल्याचे लक्षात आले. हाच धागा पकडत विविध कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध बातम्या बघायला मिळाल्या.

१० मार्च २०२२ रोजी उत्तरप्रदेश विधानसभ निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर योगी आदित्यनाथ समर्थकांनी लोक भवनाच्या समोरील रस्त्यावर विजयी मोर्चा काढला होता. याच मोर्चासमोर समाजवादी पक्षाचे कानपूर येथील सदस्य नरेंद्र सिंह यांनी निवडणुकीतील पक्षाच्या वाईट कामगिरीवर नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली आणि स्वतःला आग लावून घेतली. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत त्यांना आगीपासून वाचवले आणि रुग्णालयात नेले.

आउटलुक इंडिया, इंडिया टुडे सारख्या राष्ट्रीय माध्यमांनी घटनेविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. एकाही बातमीमध्ये त्यांच्या हातात नरेंद्र मोदींचा फोटो असल्याचा किंवा त्यांनी नरेंद्र मोदींची प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख नाही. अगदी व्हिडीओमध्येही मोदींचा फोटो बघायला मिळत नाही.

नरेंद्र सिंह यांचा चेहरा, खांदा आणि मान जळाली आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती हजरतगंज पोलीस ठाणेदार बाबू शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आग लावण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच जाळून घेतल्याचे दावे फेक आहेत. त्यांच्या हातात मोदींचा फोटो असल्याचा उल्लेख कुठेही नाही. ते स्वतःच्याच पक्षाच्या कामगिरीवर नाराज होते, याच नाराजीतून त्यांनी हे पाउल उचलले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा: पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयानंतर पोलिसांसमक्ष खलिस्तान जिंदाबादच्या नारेबाजीचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा