दररोज गोमूत्र प्राशन करत असल्यानेच मी कोरोनापासून दूर राहू शकले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मी इतर कुठलंही औषध घेतलेलं नाही आणि आतापर्यंत मला कोरोना झालाही नाही, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. प्रज्ञा सिंह यांच्या या वक्तव्यावर मोठं वादंग उभा राहिलं होतं.
सध्या प्रज्ञा ठाकूर यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असल्याचा दावा करण्यात येतोय. या दाव्याचा आधार आहे ‘महान्यूज लाईव्ह’ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली बातमी. ‘दररोज गोमूत्र पिल्याने मला काहीच त्रास होत नाही म्हणणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना श्वास घेण्यास त्रास होतोय, मुंबईत उपचारासाठी दाखल’ अशा हेडलाईनसह प्रसिद्ध बातमी आधारवड पवारसाहेब या फेसबुक ग्रुपमध्ये शेअर करण्यात आली होती.
याच बातमीचा स्क्रिनशॉट फेसबुकवर इतरही युजर्सकडून शेअर करण्यात येतोय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही ‘महान्यूज लाईव्ह’च्या लिंकवर जाऊन बातमीचा तपशील शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र बातमीच्या लिंकवर क्लीक केले असता वेबसाइटवर मात्र आम्हाला ही बातमी बघायला मिळाली नाही. वेबसाइटवरून ही बातमी डिलीट करण्यात आली असावी.
त्यानंतर आम्ही गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने बातमीसाठी वापरण्यात आलेला फिचर फोटो नेमका कधीचा आहे, ते शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ANI या वृत्तसंस्थेचं ६ मार्च २०२१ रोजीच्या ट्विटमध्ये सदर फोटो वापरण्यात आला असल्याचं आढळून आलं.
ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार श्वासोच्छवासाचा त्रास जाणवायला लागल्याने भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांन मुंबईला हलविण्यात आले होते. प्रज्ञा ठाकूर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली होती.
साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याच्या दाव्याला आधार म्हणून त्यांचा बेडवरील फोटो देखील शेअर केला जातोय. आम्ही या फोटोचा देखील शोध घेतला. आम्हाला ‘द हिंदू’च्या वेबसाईटवर १० जानेवारी २०१३ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला.
“मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांना कर्करोग” या हेडलाईनखाली प्रसिद्ध बातमीत भोपाळमधील जवाहरलाल नेहरू कर्करोग रुग्णालयाच्या हवाल्याने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना स्तनांचा कर्करोग असल्याचे निदान झाल्याची माहिती देण्यात आली होती.
दोन्ही फोटो जुनेच असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आम्ही प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला यासंदर्भातील कुठलीही माहिती मिळाली नाही. त्यांच्या प्रकृतीविषयीची शेवटची बातमी मार्चमधील आहे, ज्यावेळी त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. त्यानंतर मात्र प्रज्ञा ठाकूर यांची प्रकृती खालावण्याची कुठलीही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत. प्रज्ञा ठाकूर यांना साधारणतः दोन महिन्यांपूर्वी श्वास घ्यायला त्रास होत असल्याने मुंबईला हलविण्यात आले होते. त्यावेळचा फोटो सध्या चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय.
हे ही वाचा– ‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल मेसेज फेक!
Be First to Comment