Press "Enter" to skip to content

आपापसातील भांडणांमध्ये साधू गंभीर जखमी, सोशल मिडीयाने दिला हिंदू-मुस्लीम अँगल !

सध्या ट्वीटर आणि फेसबुकवर व्हायरल केल्या जात असलेल्या फोटोजमध्ये एक गंभीररीत्या जखमी झालेला साधू दिसतोय. हे फोटोज उत्तर प्रदेशातील ‘वृंदावन’ येथील ‘इमलीताल मंदिरा’तील प्रमुख पुजारी वैष्णव संत आणि तमाल कृष्ण दास यांचे आहेत. त्यांच्यावर एका विशेष समुदायातील (बांगलादेशी मुस्लीम) लोकांनी हल्ला करून मरणासन्न अवस्थेपर्यंत मारहाण केली. त्यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर पसार झाले आहेत, असे अनेक दावे सोशल मिडीयावर केले जाताहेत.

मुंबईतील पालघर येथील साधूंवरील हल्ल्याप्रमाणेच मथुरा पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्यात येत असल्याचा दावा देखील सोशल मिडीयावर केला जातोय. ‘सुदर्शन चॅनेल’च्या फेसबुक अकाऊंटवरून देखील अशाच आशयाची पोस्ट टाकण्यात आलीये. 

पडताळणी

आम्ही या घटनेची पडताळणी करायला सुरुवात केली असता सर्वप्रथम आम्हाला मथुरा पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून टाकण्यात आलेलं ट्वीट मिळालं. या ट्वीटमध्ये मथुरा पोलिसांनी घटनेचा तपशील दिला आहे.

मथुरा पोलिसांनी दिलेल्या तपशिलानुसार दि. ११ मे रोजी  सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी वृंदावन येथील इमलीताल गौडीय मठात ही घटना घडली. मठाचे मठाधीश वी.पी. साधू बाहेर गेल्यानंतर त्यांचे शिष्य गोविंद, सच्चिदानंद आणि जगन्नाथ आणि सिक्युरिटी गार्ड गोविंद सिंग यांच्या पुस्तकांची रूम खाली करण्यावरून भांडण झाले. त्यातच तमाल दास गंभीररित्या जखमी झाले.

जखमी तमाल दास यांच्यावर मथुरेतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून प्रकरणातील मुख्य आरोपी सच्चिदानंद यांना मथुरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. मथुरा पोलिसांनी या ट्वीटमध्ये अफवा न पसरविण्याची तंबी देखील दिली आहे.

वस्तुस्थिती:

मथुरा पोलिसांनी माहितीनुसार तीन गोष्टी स्पष्ट होतात. सोशल मिडीयावर केल्या जात असलेल्या दाव्यांप्रमाणे फोटोंमध्ये दिसणारी व्यक्ती तमाल दास हेच असून घटना वृंदावन येथीलच आहे.

तमाल दास यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. परंतु हा हल्ला आपापसातील भांडणामधून झालेलाय. शिवाय हल्लेखोर आणि पिडीत असे दोन्हीही व्यक्ती एकाच धर्माचे म्हणजेच हिंदू आहेत. बांगलादेशी मुस्लिमांचा या हल्ल्याशी अथवा या प्रकरणाशी दुरदुरपर्यंत कसलाही संबंध नाही.

हे प्रकरण धार्मिक नसून ते व्यक्तिगत भांडणांचं आहे. शिवाय हल्लेखोर व्यक्ती मथुरा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर व्हायरल झालेले दावे फेक असल्याचं स्पष्ट होतंय, त्यामुळे या दाव्यांना आम्ही ‘चेकपोस्ट’वरच अडवतोय.

हे ही वाचा- जैन मुनींच्या स्वागतासाठी मोडले सोशल डीस्टन्सिंगचे नियम, व्हायरल्सचा दावा खरा

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा