अमिताभ आणि अभिषेक बच्चन कोरोना संक्रमित झाल्याच्या बातम्या आल्यानंतर सोशल मीडियात रणबीर कपूर (ranbir kapoor), नीतू कपूर, करण जोहर यांच्या कोव्हिड१९ टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या अफवा पसरल्या आहेत.
११ जुलै रोजी स्वतः अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी ट्विट करून आपल्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असल्याचे कळवले होते. त्यानंतर माध्यमांनी या बातम्या चालवल्या, मागोमाग अभिनेत्री रेखा यांच्या गार्डची सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा बंगला सील केला गेला. त्याच्याही बातम्या समोर आल्या.
याच साखळीत बॉलीवूडमध्ये कोरोना संक्रमण म्हणत सोशल मीडियात अनेकांनी रणबीर कपूर, नीतू कपूर, करण जोहर यांना कोरोना संक्रमण झाल्याच्या पोस्ट टाकल्या. कुणी धक्का बसल्यामुळे काळजीपोटी या पोस्ट केल्या
तर कुणी नेपोटीझम म्हणजे बॉलीवूडमधील घराणेशाहीवर असणारा आपला राग व्यक्त करण्यासाठी हे ट्विट केले.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास या गोष्टी आल्यानंतर कपूर कुटुंबातील कुणी या बाबत काही खुलासा केला आहे का याची आम्ही शोधाशोध केली.
आम्हाला नीतू कपूर यांची मुलगी रीधिमा कपूर यांची एक इंस्टाग्राम पोस्ट सापडली. यामध्ये त्यांनी रणबीर आणि नीतू कपूर यांना कोरोना झाल्याचा दावा करणाऱ्या ट्विटचा स्क्रीनशॉट टाकत त्यास ‘अटेंशन सीकिंग’ म्हंटलय. दावे करण्यापूर्वी किमान पडताळणी तरी करायची अशा शब्दात खडसावले आहे शिवाय ‘आम्ही सर्व व्यवस्थित आहोत अशा अफवा पसरवणे थांबवा’ असे म्हंटले आहे.
८ जुलै रोजी नीतू कपूर यांचा जन्मदिन होता त्यानिमित्त त्यांची मुलं रणबीर (ranbir kapoor) आणि रीधिमा यांनी एक घरगुती पार्टी आयोजित केली होती. यावेळी करण जोहर आणि अगस्त्य नंदा आले होते. याच्या बातम्या अनेक माध्यमांनी केल्या होत्या.
अगस्त्य नंदा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा यांचा मुलगा आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या कोरोना संसर्गाच्या बातम्या समोर आल्यानंतर अगस्त्य नंदा याच्याद्वारे कोरोनाचे कपूर कुटुंबाला संक्रमण झाले असावे असे कयास बांधले जात आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि करण जोहर यांना कोरोनाचे संक्रमण झाले असे खात्रीशीर दावे करणाऱ्या पोस्ट फेक असल्याचे सिद्ध झाले. रणबीर कपूर यांची बहिण रीधिमा यांनी आम्ही सर्व जण ठणठणीत आहोत असे सांगितले आहे.
हेही वाचा: सुशांतची ‘सुसाईड नोट’ सापडल्याचं सांगत युट्युबर्सने दिल्या खोट्या बातम्या
[…] […]