Press "Enter" to skip to content

‘भारतीय राजाने ‘रोल्स रॉईस’ कारची बनवलेली कचरागाडी’ कहानी अच्छी है मगर सच्ची नहीं!

अलवरचे महाराज जय सिंह लंडन दौऱ्यावर असताना साध्या कपड्यांमध्ये अतिशय महागड्या समजल्या जाणाऱ्या ‘रोल्स रॉईस’ कारच्या शोरूममध्ये गेले होते. त्यावेळी गरीब भारतीय वगैरे म्हणून त्यांचा अपमान करत त्यांना तेथून हाकलून देण्यात आलं.

Advertisement

त्यानंतर महाराज आपल्या पारंपारिक शाही वेशात, लवाजम्यासह गेले तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले. महाराजांनी त्या शोरूममधील सर्वच्या सर्व सहा ‘रोल्स रॉईस’ कार खरेदी करून भारतात आणल्या. परंतु तिथे झालेल्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी सर्व कार थेट कचरा वाहण्यासाठी देऊन टाकल्या.

‘रोल्स रॉईस’ला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी महाराज जय सिंह यांची माफी मागितली आणि महाराजांना अजून सहा गाड्या भेट दिल्या. तेव्हा कुठे महाराजांनी त्या गाड्यांचा घंटागाडी म्हणून वापर बंद केला.

ही गोष्ट बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळया माध्यमांतून फिरते. सध्या देखील हीच गोष्ट सोशल मिडीयावर फिरत आहे.  

पडताळणी:

  • एकच गोष्ट वेगवेगळ्या राजा-महाराजांच्या नावे:

गुगलवर ‘rolls Royce for Garbage’ हे कीवर्ड्स टाकून सर्च केलं असता अनेक वेगवेगळ्या स्टोरीजसोबत हा एकच फोटो सगळीकडे दिसला. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी केला जाणारा दावा सारखाच आहे. गुगलवरील सर्च रिझल्ट्सनुसार जवळपास १७,९०,००० एवढ्या लिंक्स या कीवर्ड्ससोबत मिळत्या जुळत्या होत्या.

यातील साधारणतः पहिल्या ५ ते ६ पानापर्यंतच्या लिंक्सवर आम्ही एक नजर टाकली तेव्हा ही गोष्ट केवळ अलवारच्या जय सिंह महाराजांची नसून हीच गोष्ट हैद्राबादच्या निजामाची, पाकिस्तानातील बहवालपूरच्या नवाबाची, भरतपूरच्या महाराज किशन सिंह आणि पतियालाच्या भूपिंदर सिंह या सर्वांचीच असल्याचं आमच्या लक्षात आलं.

म्हणजे दाव्यात सांगितलेल्या गोष्टीतल्या फक्त जय सिंह महाराजांचं नाव बदलायचं आणि त्याठिकाणी इतर कुणाचं तरी नाव घालून ती गोष्ट व्हायरल करायची, असा एकंदरीत उद्योग. आणि हा उद्योग वर्षानुवर्षे अव्याहतपणे चालू आहे.

वेगवेगळ्या वेबसाईटवर वेगवेगळ्या राजांच्या नावाने फिरत असणारी एकच गोष्ट:

३. ती ‘रोल्स रॉईस’ नाही:

ह्या सगळ्यात सर्वाधिक गमतीची गोष्ट अशी की फोटोतील ‘रोल्स रॉईस’ गाडीचे मॉडेल कोणते हे तपासण्यासाठी आम्ही त्या कंपनीच्या अगदी सुरुवातीपासूनच्या गाड्या शोधल्या. पण आम्हाला मात्र एकही कार फोटोतल्या कारसारखी असल्याचं आढळलं नाही.

रोल्स रॉईसच्या जवळपास सर्व गाड्यांचे बोनेट समोरचे ग्रील्स चौकोनी असतात. या गाडीच्या ग्रील्सचा आकार काहीसा बदामाच्या आकाराचा आहे. त्या काळात फोर्डच्या कार सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरल्या जायच्या म्हणून आम्ही फोर्डच्या व्हिंटेज कार्स शोधण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे फोटोतील गाडीशी बरेचसे साम्य असणारी १९३४ मध्ये आलेली मॉडेल-४० ही गाडी आम्हाला सापडली. गाडीच्या समोरील ग्रील्सचा आकार आणि फोटोतील गाडीच्या ग्रील्सचा आकार पाहिलात तर दोन्ही तंतोतंत जुळतात.

त्याच १९३४ सालच्या फोर्ड ४० गाडीला थोडेसे मॉडीफाय केलेला हा खालील फोटो, यांत त्या दोन्ही गाड्यांचे साम्य चटकन लक्षात येईल.

४.झाडू अडकवला म्हणजे ती घंटागाडी नव्हे:

गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्चवर हा फोटो शोधून पाहिला असता आम्हाला त्या सारखेच गाडीला झाडू लावलेले इतरही एक दोन फोटोज दिसले. त्यापैकी एका फोटोच्या मुळाशी गेलो असता आम्ही पोहचलो जगातल्या सर्वात मोठ्या लायब्ररीज पैकी एक असणाऱ्या अमेरिकन ‘लायब्ररी ऑफ कॉंग्रेस’च्या वेबसाईटवर.

फोटोग्राफर जॉन डी. व्हायटींग याने त्याच्या आखाती देशांच्या भ्रमंतीवेळी काढलेला हा फोटो आहे. पॅलेस्टाईन म्हणजे आताच्या इस्राईलवर जेव्हा ब्रिटीशराज होतं तेव्हा तेथील अरबांनी १९३६ ते १९३९ मध्ये मोठं बंड पुकारलं होतं. त्याला ‘द ग्रेट रिव्होल्ट’ असं म्हणतात.

हे एवढं सर्व सांगण्याचं महत्वाचं कारण असं की, या काळात ब्रिटीशांच्या गाड्या पंक्चर व्हाव्यात, टायर फुटावेत म्हणून आंदोलक रस्त्यांवर छोटे छोटे अनुकुचीदार खिळे टाकून ठेवत. यावर उपाय म्हणून ब्रिटिशांनी आपल्या गाड्यांना टायरच्या समोर हे असे झाडू लाऊन घेतले होते. हिच शक्कल पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुद्धा वापरली गेल्याचे पुसटसे संदर्भ विविध ठिकाणी मिळतात. याच पद्धतीने झाडू लावलेली दुसरी एक गाडी आपण खाली बघू शकता.

वस्तुस्थिती:

वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या राजा-नवाबांच्या नावे खपवलेली ही गोष्ट त्यापैकी एकाही राजाच्या नातलगाने किंवा त्यांच्या इतिहासकारांनी पुराव्यानिशी कुठे मांडल्याचे आमच्या पडताळणीमध्ये आढळले नाही.

या उलट या गोष्टींसोबत पुरावा म्हणून फिरत असलेला फोटोच खोटा निघाला. तो फोटो भारतीय असण्यावरच शंका आहे. शिवाय त्यातील कार ‘रोल्स रॉंईस’ नसून ‘फोर्ड’ कंपनीची आहे. तिला लावलेले झाडू कचरा झाडण्यासाठी नसून खिळ्यांसारख्या अनुकुचीदार गोष्टींपासून टायरचे रक्षण करण्यासाठी आहेत.

या सर्वांचा अर्थ एकच की, हा फोटो पूर्णतः खोटा आहे आणि गोष्टीला पुराव्यांची पुष्टी नसल्याने ती सुद्धा विश्वासार्ह नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे फिरत असलेली ही रोचक कथा फॉरवर्ड करण्यास आम्ही ‘चेकपोस्ट’वर लाल निशाण फडकावत आहोत.

हे ही वाचा- ‘मोदींची निवड WHO च्या चेअरमनपदी’ म्हणत अभिनंदन करणाऱ्यांनो, असं कुठलं पदच अस्तित्वात नाही !

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा