जगप्रसिद्ध पॉप स्टार रियाना (rihanna) हीने दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना संदर्भातील बातमी रिट्विट केली आणि जगभरात खळबळ उडाली. सोशल सोशल मीडियात रिहाना ट्रेंड व्हायला लागली. रिहानाने सीएनएनची बातमी ट्विट करत “आपण यावर का बोलत नाही आहोत” असा सवाल केला होता.
ट्विटरवर रियाना (rihanna) ट्रेंड व्हायला लागल्यानंतर लगेचच रिहाना पाकिस्तानी असल्याचे दावे केले जायला लागले. भाजप नेते हरी मांझी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर ‘काँग्रेस आणि डाव्यांना आता पाकिस्तानी गायिकेचा आधार’ अशा कॅप्शनसह ट्विट करत रियाना पाकिस्तानी असल्याचा दावा केला. त्यांचं हे ट्विट साधारणतः २००० युजर्सकडून रिट्विट केलं गेलंय.
उत्तर प्रदेश भाजप युवा मोर्चाशी संबंधित ‘अभिषेक’ यांनी रियानाचा पाकिस्तानचा झेंडा लपेटलेला फोटो ट्विट केलाय. ही पोस्ट देखील ७१४ युजर्सकडून रिट्विट करण्यात आलीये.
गुगलवर देखील रियाना मुस्लिम आहे का किंवा रिहानाचा धर्म कुठला हे मोठ्या प्रमाणात सर्च केलं गेलं.
पडताळणी:
रियानाचे मुळ नाव रॉबिन रियाना फेंटी असून कॅरेबियन बेटांमधल्या बार्बाडोस या देशात तिचा जन्म झाला. 32 वर्षीय रियाना पॉप-सिंगर असून आजवरच्या कारकिर्दीत तिला 8 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. रियानाचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झालेला आहे, म्हणजेच ती मुस्लिम धर्मीय किंवा पाकिस्तानी नाही.
टाईम मॅगझीनने 2012 आणि 2018 साली जगातल्या 100 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या यादीत रियानाचा समावेश केला होता. रियाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत ती जगात चौथ्या क्रमांकावर आहे. ट्विटरवर जगभरातील 10 कोटींपेक्षा अधिक लोक तिला फॉलो करतात.
रियाना सामाजिक-राजकीय विषयांवर कायमच भूमिका घेत असते. भारतातील शेतकरी आंदोलनाविषयीची बातमी ट्विट केल्यानंतरचं तीचं ट्विट म्यानमारमधील सत्तापालटाच्या घटनाक्रमावर आहे. आपल्या प्रार्थना म्यानमारसोबत असल्याचं रियानाने म्हंटलंय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील रियाना जो बायडन यांच्या समर्थनात उतरली होती.
पाकिस्तानचा झेंडा लपेटलेला रियानाचा फोटो ज्यावेळी रिव्हर्स सर्चच्या माध्यमातून शोधला त्यावेळी ग्लोब ट्रोटर या युट्यूब चॅनेलवरून 1 जुलै 2019 रोजी अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रियानाचा फोटो बघायला मिळाला. या फोटोमध्ये तिने पाकिस्तानचा नाही, तर वेस्ट इंडिजचा झेंडा लपेटलेला असल्याचे बघायला मिळाले.
रियाना 2019 सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील वेस्ट-इंडिज विरुद्ध श्रीलंका दरम्यानच्या सामन्याला उपस्थित राहिली होती. हा फोटो त्याचवेळचा आहे. आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून देखील त्याच दिवशी रियानाचा हा फोटो ट्विट करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ना रियाना पाकिस्तानी आहे, ना मुस्लिम धर्मीय. रियानाचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाकिस्तानचा झेंडा लपेटलेला फोटो एडिटेड असून मूळ फोटोमध्ये तिने स्वतःच्या देशाचा म्हणजेच वेस्ट इंडिजचा झेंडा लपेटलेला आहे.
हे ही वाचा- महिलांना चिरडत असलेल्या ट्रॅक्टरचा व्हिडीओ दिल्लीतील ट्रॅक्टर परेड दरम्यानचा नाही!
Be First to Comment