आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच आपल्या कार्यालयात भगतसिंग (Bhagat Singh) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो लावला. आम आदमी पक्षाकडून निवडणुकीपूर्वीच याबाबतची घोषणा करण्यात आली होती.
सध्या मात्र मान यांच्या कार्यालयातील भगतसिंगांच्या फोटोवरून वाद निर्माण झाला आहे. मान यांच्या कार्यालयातील भगतसिंगांचा पिवळ्या रंगाच्या पगडीतील फोटो ‘काल्पनिक’ असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात येतेय.
दिल्लीच्या भगतसिंग रिसर्च सेंटरचे मानद सल्लागार आणि भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिणारे प्रा. चमन लाल इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगतात की आम्ही यापूर्वी अनेकवेळा स्पष्ट केले आहे की भगतसिंग यांनी कधीही पिवळ्या किंवा केसरी रंगाची पगडी घातली नव्हती. पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या पगडीमधील भगतसिंगांचे फोटो काल्पनिक आहेत.
प्रा. चमन लाल पुढे सांगतात की भगतसिंगांचे फक्त चार मूळ फोटो उपलब्ध आहेत. तुरुंगातील फोटोत त्यांचे केस मोकळे आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांच्या डोक्यावर टोपी आहे आणि इतर दोन फोटोंमध्ये त्यांच्या डोक्यावर पांढरी पगडी बघायला मिळतेय. भगतसिंग यांचे पिवळ्या किंवा केशरी पगडीतील किंवा हातात शस्त्र घेऊन घेतलेले इतर सर्व फोटोज काल्पनिक आहेत. त्यातील काही पेंटिंग्ज सुद्धा आहेत.
प्रा. चमन लाल म्हणतात की पंजाब सरकारने आपल्या कार्यालयांमध्ये भगसिंगांच्या मूळ चार फोटोंपैकी कुठलाही फोटो वापरावा. काल्पनिक पेंटिंग्जचा उपयोग कुठल्याही अधिकृत कामांसाठी केला जाऊ नये. राजकीय पक्षांनी भगतसिंगांच्या विचारसरणीबद्दल चर्चा केली पाहिजे आणि केवळ राजकीय फायद्यासाठी भगतसिंगांच्या नावाचा वापर करण्याऐवजी त्यांच्या विचारांबद्दल तरुणांशी संवाद साधला पाहिजे.
भगतसिंगांच्या मूळ फोटोज संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रा. चमन लाल, भगतसिंग यांची बहीण बीबी अमर कौर (Bibi Amar Kaur) यांचे चिरंजीव आणि भगतसिंगांचे भाचे जगमोहन सिंग आणि भगतसिंगांचे पुतणे अभय सिंग संधू यांनी त्यांच्या चार मूळ फोटोजच्या प्रति देशभरात वितरित केल्या होत्या. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांना पत्र लिहून केवळ मूळ फोटोज वापरण्याची विनंती केली होती.
प्रा. चमन लाल सांगतात की या पत्रानंतर काही काळ सरकारी जाहिरातींमध्ये भगतसिंगांचा पांढऱ्या पगडीमधील फोटो वापरला जायला लागला होता. मात्र गेल्या चार-पाच वर्षांमध्ये पुन्हा जाहिरातीमध्ये पेंटिंग्जवर आधारलेले फोटोज वापरले जाताहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे.
दरम्यान, भगतसिंगांचे भाचे जगमोहन सिंग भगतसिंग यांच्या पगडी संदर्भातील वादाला अनावश्यक महत्व देण्याची गरज नसल्याचे सांगतात. मात्र त्याचवेळी भगतसिंग यांचे केवळ चारच मूळ फोटो उपलब्ध असून त्यामध्ये भगतसिंग यांनी पिवळी पगडी घातलेली नसल्याची बाब जगमोहन देखील मान्य करतात.
पिवळ्या पगडीची एवढी चर्चा का?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान स्वतः पिवळ्या रंगाची पगडी घालतात. पंजाबमध्ये पिवळ्या रंगाच्या पगडीला विरोध आणि क्रांतीचे प्रतीक मानले जाते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनात देखील पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांनी पिवळी पगडी आणि पिवळ्या झेंड्यांचा वापर केला होता.
हेही वाचा- काँग्रेस नेत्यांनी तुरुंगात भगतसिंगांची भेट न घेतल्याच्या दाव्यात किती तथ्य?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- भगवंत मान यांच्या कार्यालयातील भगतसि… […]