Press "Enter" to skip to content

पंतप्रधान जन औषधी केंद्रांवर ‘रेमेडीसिव्हीर’ उपलब्ध नाही, व्हायरल पोस्टच्या माध्यमातून दिशाभूल!

सोशल मीडियावर दावा केला जातोय की कोरोना व्हायरवरील उपचारांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असलेले ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शन प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर उपलब्ध असून (Remdesivir available at Prime Minister Jan Aushadhi Kendra) मेडिकल स्टोअरमध्ये ४००० रुपयांना विकले जात असलेले हे इंजेक्शन या केंद्रांवर केवळ ८९९ रुपयांमध्ये मिळू शकते. इंजेक्शन मिळविण्यासाठी रूग्णाचे आधार कार्ड, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणि इंजेक्शन विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डची आवश्यकता असेल. 

Advertisement

पडताळणी:

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवरील उपचारामध्ये ‘रेमेडीसिव्हीर’ची महत्वाची भूमिका समोर आल्याने ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शनच्या मागणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळतेय. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने या इंजेक्शनचा काळाबाजार देखील सुरु झाला आहे. अव्वाच्या सव्वा किमतींमध्ये या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे या इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत अनेक अफवा पसरवल्या जाताहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम प्रधानमंत्री जन औषधी केंद्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली. या केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध औषधींच्या यादीमध्ये रेमेडीसिव्हीरचा शोध घेतला. मात्र या यादीमध्ये कुठेही आम्हाला रेमेडीसिव्हीरचा उल्लेख बघायला मिळाला नाही. त्यानंतर आम्ही जन औषधी केंद्राच्या हेल्पलाईनशी आणि काही जन औषधी केंद्र चालवणाऱ्या विक्रेत्यांशी देखील संपर्क साधला. मात्र औषधी केंद्रामध्ये रेमेडीसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे आणि या केंद्रांवरून रेमेडीसिव्हीरची विक्री केली जात नसल्याची माहिती आम्हाला देण्यात आली.

रेमेडीसिव्हीरचा उपयोग कुणासाठी?

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी १३ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, “रेमेडीसिव्हीरचा उपयोग फक्त कोरोनावरील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल झालेल्या आणि बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असलेल्या रुग्णांसाठीच करण्यात यावा. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि घरातच कोरोनावरील उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन नाही. शिवाय मेडिकल स्टोअरमधून हे इंजेक्शन खरेदी केले जाऊ शकत नाही.

रेमेडीसिव्हीर कुणी विकसित केली?

कॅलिफोर्नियामधील गिलियड सायन्सेसकडून २००९ मध्ये ‘हेपेटायटीस सी’ या आजारावरील उपचारासाठी रेमेडीसिव्हीर विकसित करण्यात आले. मात्र २०१४ पर्यंत फारशी परिणामकारकता न आढळल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. २०१४ मध्ये मात्र इबोला व्हायरसवरील उपचारासाठी रेमेडीसिव्हीरचा उपयोग केला जायला लागला. तेव्हाचपासून मिडल ईस्ट रेस्पीरेटरी सिंड्रोम (एमईआरएस) आणि सिव्हिअर ऍक्युट रेस्पीरेटरी सिंड्रोम (एसएआरएस) या कोरेनाव्हायरस गटातील आजारांवरील उपचारासाठी रेमेडीसिव्हीरचा वापर केला जात आहे, अशी माहिती ‘इंडिया टुडे’वर प्रकाशित रिपोर्टमध्ये मिळाली.

भारतात कुठल्या कंपन्यांकडून रेमेडीसिव्हीरचे उत्पादन केले जाते?

मायलॅन, हेटरो, ज्युबिलियंट लाइफ सायन्सेस, सिप्ला, डॉ. रेड्डीज, झायडस कॅडिला आणि सन फार्मा या ७ कंपन्या भारतात रेमेडीसिव्हीरचे उत्पादन करतात. या ७ कंपन्यांची मिळून दरमहा ३८.८० लाख रेमेडीसिव्हीर उत्पादनाची क्षमता आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या कंपन्यांना रेमेडीसिव्हीरचे उत्पादन दरमहा ७८ लाखांपर्यंत वाढविण्यास सांगण्यात आले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेमेडीसिव्हीरच्या किंमती वेगवेगळ्या असून सरकारने कंपन्यांना स्वेच्छेने किंमती ३५०० रुपयांपर्यंत घटविण्याचे सुचवले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर केवळ ८९९ रुपयांमध्ये ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शन उपलब्ध असल्याचा (Remdesivir available at Prime Minister Jan Aushadhi Kendra) दावा चुकीचा आहे.

प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावरून ‘रेमेडीसिव्हीर’ची विक्री केली जात नाही. शिवाय हे इंजेक्शन फक्त ऑक्सिजनवरील रुग्णांसाठीच वापरले जावे, असे निर्देश आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन नाही.

हे ही वाचा- सिप्ला कंपनी कोव्हीड१९ रुग्णास थेट हॉस्पिटलमध्ये ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शन पुरवतेय?

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा