नेताजी सुभाषचंद्र बोस (netaji subhash chandra bose) यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात सुभाषबाबूंच्या पोर्ट्रेटचे अनावरण केले. याच दिवशी राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात पोस्ट टाकण्यात आली.
काल म्हणजे २५ जानेवारी रोजी सोशल मीडियावर अनेकांकडून दावा केला गेला की राष्ट्रपतींनी ज्या पोर्ट्रेटचे अनावरण केले आहे, ते सुभाषबाबुंचे नसून सुभाषबाबूंवरील ‘गुमनामी’ या चित्रपटात नेताजींची भूमिका निभावणाऱ्या बंगाली अभिनेता प्रसेनजीत चॅटर्जी यांच्या पेंटिंगवरून बनविण्यात आले आहे.
बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सिद्धार्थ भाटिया, रोहिणी सिंग, सागरिका घोष, स्वाती चतुर्वेदी यांसारख्या ख्यातनाम पत्रकारांनी तसेच पश्चिम बंगाल काँग्रेस, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, छत्तीसगढ काँग्रेसमधील मंत्री टीएस सिंग देव यांसारख्या राजकारण्यांनी आणि रिचा चड्ढा, स्वरा भास्कर या अभिनेत्रींनी देखील असेच दावे करत राष्ट्रपती भवनावर अक्षम्य चूक केल्याचा आरोप करत हे पोर्ट्रेट मागे घेण्याची मागणी केली.
पडताळणी:
राष्ट्रपती भवनाकडून अनावरण करण्यात आलेले पोर्ट्रेट सुभाषबाबूंचे नसून अभिनेता प्रोसेनजित चॅटर्जी यांच्या पेंटिंगवरून बनविण्यात आल्याचे दावे प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यानंतर सुभाषबाबूंचे नातू चंद्रकुमार बोस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सुभाषबाबूंचा फोटो पोस्ट करत पोर्ट्रेट सुभाषबाबूंचेच असल्यावर शिक्कामोर्तब केलं.
चंद्रकुमार बोस यांनी यांनी सुभाषबाबूंचा फोटो ट्विट करत याच फोटोवरून ख्यातनाम चित्रकार परेश मैती यांनी बनवलेल्या सुभाषबाबूंच्या पोर्ट्रेटचे २३ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण करण्यात आल्याची माहिती दिली.
पडताळणी दरम्यान आम्हाला बंगाली अभिनेते प्रोसेनजित चॅटर्जी यांचं देखील ट्विट मिळालं. राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेल्या नेताजींच्या पोर्ट्रेटचा फोटो ट्विट करताना प्रोसेनजित चॅटर्जी यांनी नेताजींच्या स्मरणार्थ साकारलेल्या अप्रतिम कलाकृतीबद्दल चित्रकार परेश मैती यांचं अभिनंदन केलंय.
चंद्रकुमार बोस यांच्या ट्विटनंतर चुकीच्या दाव्यांसह हा फोटो शेअर केलेल्या अनेक नामवंत पत्रकार, राजकारणी आणि कलाकारांनी आपले ट्विट्स डिलीट केले आहेत. बऱ्याच जणांनी याविषयीचे ‘फॅक्ट चेक’ देखील ट्विट केले आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस (netaji subhash chandra bose) यांच्या पोर्ट्रेटसंदर्भात करण्यात आलेले दावे चुकीचे आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अनावरण करण्यात आलेले पोर्ट्रेट सुभाषबाबूंचेच असून ख्यातनाम चित्रकार पद्मश्री परेश मैती यांनी ते बनवले आहे.
हे ही वाचा- ममता बॅनर्जींचे मुस्लीम प्रेम दाखवण्यासाठी ‘बंगाल भाजप’ने शेअर केला एडीटेड व्हिडीओ!
[…] हे ही वाचा- राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेल… […]