काल अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. अयोध्येत भूमिपूजन सोहळा पार पडला आणि सोशल मीडियावर अयोध्येच्या संदर्भात ऐतिहासिक निकाल देणारे देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याचा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागला.
रंजन गोगोई कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा व्हायरल व्हायला कारणीभूत ठरली ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ या हिंदी न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर यासंदर्भात प्रकाशित झालेली बातमी.
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते राजीव राय यांनी ट्विट करून आपल्या फॉलोअर्सपर्यंत ही बातमी पोहोचवली. हे ट्विट २४६ जणांनी रिट्विट केलं.
अनेक युजर्स ही बातमी अयोध्या आणि बाबरी यांच्याशी संदर्भ जोडून शेअर करताहेत. अली सोहराब या युजरने शेअर केलेल्या बातमीचं ट्विट ९०४ वेळा रिट्विट केलं गेलंय.
सुजित सिंगच्या मते रामाने कोरोनाच्या रूपात रंजन गोगोईंना प्रसाद दिलाय.
पडताळणी:
रंजन गोगोई कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीची खातरजमा करण्यासाठी आम्ही पडताळणी सुरु केली. सर्वप्रथम आम्ही रंजन गोगोई यांच्या ट्विटर अकाउंटवरून याविषयी काही माहिती देण्यात आली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला ट्विटरवर रंजन गोगोई यांचं अधिकृत अकाउंट सापडलं नाही.
पडताळणी दरम्यान आम्हाला ‘बार अँड बेंच’ या कायदेविषयक वेबसाईटच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेलं ट्विट मिळालं. या ट्विटनुसार खुद्द रंजन गोगोई यांनीच ‘बार अँड बेंच’शी बोलताना आपण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याची माहिती दिली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की खुद्द रंजन गोगोई यांनीच आपण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोगोईंनी स्वतःच या बातम्यांचा इन्कार केल्यानंतर ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ने देखील आपल्या वेबसाईटवरून रंजन गोगोई कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी काढून टाकली आहे.
हेही वाचा: अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाचं जनसंघ, RSS कनेक्शन खरंय का?
[…] हेही वाचा: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना कोरोन… […]
[…] हेही वाचा: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना कोरोन… […]