सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा १० सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात येतोय. या १० सेकंदांच्या व्हिडीओच्या आधारे राहुल गांधी शेतकरी कर्जमाफीच्या (rahul gandhi on farm loan waiver) आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं भासविण्याचा प्रयत्न केला जातोय.
व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणताहेत “किसान का कर्ज़ा माफ़ नहीं करना चाहिए क्योंकि अगर किसान का कर्जा माफ़ किया तो किसान की आदत ख़राब हो जाएगी”
फेसबुकवर अनेक युजर्सकडून या व्हिडीओच्या आधारे राहुल गांधी शेतकरी विरोधी असल्याचं भासविण्याचा प्रयत्न केला जातोय.
पडताळणी:
आम्ही व्हायरल व्हिडिओची पडताळणी सुरु केली त्यावेळी आमच्या असंही लक्षात आलं की यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये देखील हाच व्हिडीओ दुसऱ्या एका व्हिडीओसोबत जोडून शेअर केला गेला होता.
२०१३ साली काँग्रेस सत्तेत असताना शेतकरी कर्जमाफीच्या (rahul gandhi on farm loan waiver) विरोधात असणारे राहुल गांधी केंद्रातील सत्ता गेल्यानंतर सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीचे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा दावा त्यावेळी केला गेला होता.
पडताळणी दरम्यान आम्हाला राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ मिळाला. राहुल गांधींचा हा व्हिडीओ २०१८ साली झालेल्या छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा आहे. छत्तीसगढमधील बिलासपूर येथे झालेल्या रॅलीत राहुल गांधी यांनी दिलेल्या भाषणाशी छेडछाड करून सध्याचा १० सेकंदाचा व्हिडीओ बनविण्यात आलेला आहे.
बिलासपूर येथील रॅलीतील भाषणात राहुल गांधी म्हणाले होते, “पिछले साल हिंदुस्तान की सरकार ने ढाई लाख करोड़ रुपया हिंदुस्तान के सबसे बड़े पंद्रह उद्योगपतियों का कर्ज़ा माफ़ किया है. ढाई लाख करोड़ रुपया. मगर वही सरकार जो पंद्रह लोगो के लिए ढाई लाख करोड़ रुपया माफ़ कर सकती है, वही सरकार हिंदुस्तान के करोड़ो किसानों के लिए एक रुपया भी कर्ज़ा माफ़ नहीं कर सकती है. उनके नेता कहते हैं कि किसान का कर्ज़ा माफ़ नहीं करना चाहिए. कि अगर किसान का कर्ज़ा माफ़ किया तो किसान की आदत ख़राब हो जाएगी”
यातून स्पष्ट होतंय की राहुल गांधींनी निवडणूकपूर्व प्रचाराच्या भाषणात भाजप नेत्यांवर टीका करताना म्हटलंय की पंधरा उद्योगपतींचे अडीच लाख करोड माफ करणाऱ्या भाजपचे नेते म्हणताहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला नको, कारण त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची वाईट सवय लागेल.
राहुल गांधींच्या या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ काँग्रेस पक्षाच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या २७ मिनिटे ५४ सेकंदापासून ते २८ मिनिटे ५४ सेकंदादरम्यानच्या फुटेजमध्ये आपण राहुल गांधींना ऐकू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात भूमिका घेतली नव्हती. छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच्या ‘किसान आदिवासी रॅली’ दरम्यानमधील राहुल गांधी यांच्या भाषणाशी छेडछाड करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांवर शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करताना भाजप नेते शेतकरी कर्जमाफीविषयी काय म्हणतात हे सांगण्यासाठी जे विधान केलं होते, ती राहुल गांधी यांची शेतकरी कर्जमाफीची भूमिका असून ते शेतकरी विरोधी आहेत, असं भासविण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर केला जातोय.
हे ही वाचा- राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !
Be First to Comment