सोशल मीडियावर 14 सेकंदाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. भाजपच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या रॅलीत “साईकिल पर बटन दबाना है, पाकिस्तान बनाना है” अशा घोषणा दिल्या जात असल्याचा दावा या व्हिडीओसह करण्यात येतोय.
भाजप नेते वाय सत्य कुमार, अभिजित सिंग सांगा आणि मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी देखील व्हिडीओ ट्विट करत अशाच प्रकारचे दावे केले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट करत समाजवादी पक्षाच्या रॅलीत ‘पाकिस्तान बनाना है’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले.
‘नवभारत टाईम्स’च्या वेबसाईटवर यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उजव्या विचारधारेशी संबंधित ‘ऑप-इंडिया’च्या वेबसाईटवर देखील या बातमीला प्रसिद्धी देण्यात आली आहे.
पडताळणी:
व्हायरल दाव्याच्या पडताळणी दरम्यान गुगलवर किवर्डच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला दैनिक भास्करची बातमी बघायला मिळाली. या बातमीमध्ये संबित पात्रा यांनी केलेले दावे चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
भास्करच्या बातमीनुसार, सपा समर्थकांकडून निवडणुक प्रचारादरम्यान “माटी चोर को भगना है…” असा नारा दिला जात आहे. विद्यमान भाजप आमदारावर विधानसभेच्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खननाचा आरोप असल्याने समाजवादी पक्षाकडून या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला जात आहे.
निवडणूक आयोगाकडून देखील संबंधित दाव्याचे खंडन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की बिठूर विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाच्या उमेदवाराकडून ‘पाकिस्तान बनाना है’ची घोषणाबाजी करण्यात आल्याच्या घटनेसंदर्भात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा एफएसटी पथकाकडून तपास करण्यात आला. तपासादरम्यान मूळ व्हिडिओची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये कुठेही पाकिस्तान शब्दाचा उल्लेख आढळून आलेला नाही. सपा उमेदवारावर करण्यात येत असलेले आरोप खोटे आहेत. एडिटेड व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान समाजवादी पक्षाच्या उमेदवाराकडून “साईकिल पर बटन दबाना है, पाकिस्तान बनाना है” अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत.
निवडणूक आयोगाच्या तपासात सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोगाकडून व्हायरल दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे. तसेच अशाप्रकारचे चुकीचे दावे व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या कृपेने मंदिरात नमाज पढले जातेय? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment