Press "Enter" to skip to content

मुसलमानांच्या कथित ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांविरोधात हिंदूंनी रॅली काढल्याचा व्हिडीओ फेक!

मुस्लीम समुदायाने मोहरमच्या दिवशी उज्जैनमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी (Pro Pakistan slogans at Moharram event) केल्याने, हिंदूंनी त्याच जागी मशिदीसमोर रॅली काढत पाकिस्तानविरोधी घोषणा देत जशासतसे उत्तर दिल्याचे दावे करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Advertisement
'उज्जैन (मध्य प्रदेश) की मस्जिद के सामने मुसलमानों ने मुहर्रम के जुलूस में अपनी औक़ात दिखाते हुए, “पाकिस्तान ज़िंदाबाद” के नारे लगाए थे । 
ठीक उसी मस्जिद के सामने दूसरे  दिन हिंदुओं ने अपनी एकता और ताक़त का प्रदर्शन कर दिया । 
उज्जैन पर सारा देश आज गर्व कर रहा है !
❤️ धन्यवाद उज्जैन !❤️'

अशा मजकुरासह मशिदींच्या समोरून ‘नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भ*वा है!’ अशा घोषणा देत चाललेल्या भगवे झेंडे नाचवणाऱ्या हिंदू समुदायाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

अर्काइव्ह लिंक

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप अशा सर्वच माध्यमांतून हे दावे व्हायरल होतायेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अंबादास जरारे आणि बळीराम पाटील यांनी सदर दाव्यांची पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

सदर व्हायरल दाव्यात दोन महत्वाचे उपदावे आहेत. एक म्हणजे उज्जैन मध्ये मोहरमच्या दिवशी मुस्लीम समुदायाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले (Pro Pakistan slogans at Moharram event) आणि दुसरा म्हणजे त्या विरोधात हिंदू समुदायाने पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली. या दोन्ही दाव्यांत खरेच काही तथ्य आहे का हे आम्ही स्वातंत्र्यरित्या तपासलं.

मुस्लीम समुदायाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले होते का?

  • व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले असता आम्हाला दोन्ही बाजू मांडणारे रिपोर्ट्स मिळाले.
  • उज्जैनमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या गेल्या. त्यासंबंधी कारवाई करत मध्यप्रदेश पोलिसांनी ‘राष्ट्रविरोधी घोषणाबाजी’ केल्याच्या आरोपाखाली ७ जणांना अटक केली. यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘तालिबानी मानसिकता किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं की जाएगी और सभी आवश्यक कदम उठाए जाएंगे’ अशी प्रतिक्रिया दिली. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
  • याउलट विविध फॅक्टचेक वेबसाईट्सने आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे आरोप खोटे असून मुस्लिम समुदायाने ‘काझी साहब जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या परंतु त्याचा विपर्यास करत मध्यप्रदेश शासन प्रशासन मुस्लीम आकसापायी अशा तर्हेची कारवाई करत असल्याचे सांगितले आहे.
  • यासंबंधी काही व्हिडीओजसुद्धा समोर आले आहेत, ज्यामध्ये बारकाईने ऐकल्यास खरेच ‘काझी साहब जिंदाबाद’ अशा घोषणा ऐकू येतात.

त्याच ठिकाणी हिंदू समुदायाने पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्याच्या व्हिडीओचे सत्य काय?

  • व्हायरल व्हिडिओच्या की फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या असता २०१९ साली युट्युबवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला.
  • कर्नाटकमधील गुलबर्गा येथे रामनवमी निमित्त हिंदू समुदायाने जल्लोष केला होता, त्यावेळचा तो व्हिडीओ आहे. १३ एप्रिल २०१९ रोजी अपलोड झालेल्या या व्हिडीओमधील मस्जिद, त्यांवरील कलाकुसर, घुमट, मिनारे तंतोतंत जुळणारे होते. केवळ व्हायरल व्हिडीओमध्ये मशिदीसमोर उभी असलेली पोलीस व्हॅन दिसून येत नाही.
  • गुलबर्गा आणि रामनवमी हाच धागा पकडत पुन्हा आम्ही शोधाशोध केली असता याच उत्सवाचा २०१८ सालचा एक व्हिडीओ आम्हाला सापडला. सदर व्हिडिओमध्ये ती पोलिसांची व्हॅन दिसते आहे. परंतु यातही कुठे ‘पाकिस्तान विरोधी’ घोषणा दिल्याचे आढळत नाही. केवळ रामनमवी विषयी गाणी वाजत आहेत.
  • मग व्हायरल व्हिडीओत पाकिस्तान विरोधी घोषणा कुठून आल्या हे शोधण्यासाठी आम्ही पुन्हा शोधाशोध केली असता २०१८ साली युट्युबवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ सापडला. सदर व्हिडीओ ठाण्यातील असल्याचे त्यामध्ये लिहिले आहे. या व्हिडीओमधील नारेबाजी आणि व्हायरल व्हिडीओतील नारेबाजी तंतोतंत जुळणारी आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की मोहरमच्या दिवशी मुस्लीम समुदायाने कथितरीत्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून उज्जैन मधील त्याच मशिदीसमोर हिंदूंनी रॅली काढत पाकिस्तानी विरोधी घोषणा दिल्याचे दावे फेक आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुलबर्गा येथील २०१८ सालच्या रामनवमी उत्सवाचा असून त्या व्हिडीओला ठाण्याच्या एका व्हिडीओचा ऑडीओ जोडला आहे. हिंदू मुस्लीम सलोख्यात मुद्दामहून मिठाचा खडा टाकण्याचा कुणा धर्मांधाचा हा खोडसाळपणा असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: पंडित नेहरूंच्या आईचे नाव ‘थुसू रेहमान बाई’ होते? ती मुस्लीम होती?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा