उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अगदी चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. विविध राजकीय पक्षांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. अशात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचा एक फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की उत्तर प्रदेशातील निवडणूक येताच प्रियंका गांधींनी साडी नेसायला सुरुवात केली आहे.
फोटोमध्ये प्रियांका गांधी लाल रंगाच्या साडीमध्ये कुठल्याशा मंदिरातील घंटी वाजवत असताना दिसताहेत. हा फोटो शेअर करत असताना दावा केला जातोय की प्रियांका गांधी आपल्या आजी आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची साडी घालून उत्तर प्रदेशातील हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताहेत. परंतु पदरात तेच पडेल, जे फोटोत बघायला मिळतंय. फोटीतील घंटेच्या आधारे काँग्रेसच्या हाती काहीही लागणार नसल्याचा दावा केला जातोय.
पडताळणी:
आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता असे लक्षात आले की बिहार निवडणुकीच्या वेळी देखील प्रियांका गांधींचा हा फोटो काहीश्या अशाच दाव्यांसह बिहार निवडणुकीच्या संदर्भाने शेअर केला गेला होता. म्हणजेच फोटो सध्याचा नसून जुना आहे, हे येथेच स्पष्ट झाले. परंतु रिव्हर्स सर्चमध्ये फोटो नेमका कुठला आहे याविषयीची माहिती मिळू शकली नाही.
त्यानंतर आम्ही गुगलवर किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता फोटो स्टॉक प्लॅटफॉर्म Getty Images च्या वेबसाईटवर प्रियांका गांधींचा लाल साडीतील फोटो बघायला मिळाला. या फोटोमध्ये प्रियांका गांधींनी तीच साडी घातलेली आहे, जी व्हायरल फोटोत आहे.
फोटोच्या कॅप्शनमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, हा फोटो 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा आहे. अमेठी येथील दुर्गा मंदिरातील हा फोटो असून प्रियांका गांधी त्यावेळी राहुल गांधींचा प्रचार करत होत्या.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. फोटो सध्याचा नसून जवळपास 11 वर्षांपूर्वीचा आहे. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीतील राहुल गांधी यांच्या प्रचारा दरम्यानचा फोटो सध्याच्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संदर्भाने व्हायरल होतोय.
हेही वाचा- भाजप आणि आप नेत्यांकडून राहुल आणि प्रियांका गांधींचा एडिटेड फोटो शेअर!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment