Press "Enter" to skip to content

पंतप्रधान मोदींनी स्वतः आंदोलक शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे ठोकले?

शेतकरी आंदोलनाचे वाढते स्वरूप बघता केंद्र सरकारकडून दिल्लीच्या सीमांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी पोहोचता येऊ नये यासाठी आंदोलनस्थळी जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया लावण्यात आल्या आहेत.  

याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोमध्ये ते रस्त्यावर लोखंडी खिळे ठोकताना दिसताहेत. दावा केला जातोय की गाजीपूर बॉर्डरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः आंदोलक शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकताहेत.

Advertisement

काही युजर्सकडून हाच फोटो नरेंद्र मोदी (Narendra Modi) अरुणाचलच्या सीमा सील करत असतानाचा म्हणून शेअर केलाय. आम आदमी पार्टीचे सदस्य आणि सुलतानपूर माजरा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुकेश अहलावात यांनी देखील हे ट्विट रिट्विट केलंय. 

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्च केला असता आम्हाला ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवर १५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये नरेंद्र मोदी यांचा मूळ फोटो बघायला मिळाला. या फोटोत मोदी रस्त्यावर खिळे ठोकताना नाही, तर हातात झाडू घेऊन साफ सफाई करताना दिसताहेत.

Source: Loksatta

लोकसत्ताच्या बातमीनुसार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अन्य केंद्रीय मंत्री हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले होते.

ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हॅण्डलवर नरेंद्र मोदी हातात झाडू घेऊन साफ सफाई करत असतानाचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. दिल्लीमधील बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेत मोदींनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ केल्याची माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एडिटेड आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वीच्या फोटोशी छेडछाड करून नरेंद्र मोदी आंदोलक शेतकऱ्यांच्या मार्गात लोखंडी खिळे ठोकत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे ही वाचा- नरेंद्र मोदींना ‘विश्वनेता’ संबोधणारे जो बायडन यांचे ट्विटर हँडल फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा