सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल होतंय. ग्राफिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एका खुर्चीवर बसलेले दिसताहेत. ग्राफिक शेअर करताना दावा केला जातोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या नवरीप्रमाणे ब्युटीपार्लरमध्ये जाऊन मेकअप करून घेण्यात व्यस्त आहे. ज्या देशाचा पुरुष पंतप्रधान असे शौक बाळगतो, त्या देशाचा सर्वनाश होणे अटळ असल्याचे सांगण्यात येतेय.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधला असता ‘जनसत्ता’च्या वेबसाईटवर 17 मार्च 2016 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये व्हायरल फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार लंडनमधील जगप्रसिद्ध मॅडम तुसाद संग्रहालयाच्या टीमने पंतप्रधान मोदींचा पुतळा बनवण्यासाठी त्यांच्या शरीराचे मोजमाप घेतले होते.
जनसत्ताच्या बातमीवरून स्पष्ट होतेय की व्हायरल फोटोत महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेकअप करत नव्हती, तर मॅडम तुसाद संग्रहालयातील (Madame Tussauds Museum) पुतळा बनविण्यासाठी मोदींच्या शरीराचे मोजमाप घेतले जात होते. फोटोत दिसणाऱ्या महिलेच्या हातातील किटवर मॅडम तुसाद संग्रहालयाचा लोगो देखील बघायला मिळतोय.
मॅडम तुसाद संग्रहालयाच्या अधिकृत युट्युब चॅनलवरही त्यावेळचा व्हिडीओ अपलोड केलेला आहे.
मॅडम तुसाद संग्रहालय
लंडन येथील मॅडम तुसाद संग्रहालय जगभरामध्ये प्रसिद्ध असून या संग्रहालयात जगभरातील अनेक नामवंत व्यक्तींचे मेणाचे पुतळे बघायला मिळतात. लंडन व्यतिरिक्त जगभरातील इतरही महत्वपूर्ण शहरांमध्ये संग्रहालयाच्या शाखा आहेत.
सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा यांसारख्या भारतातील अनेक नामवंतांचे मेणाचे पुतळे मॅडम तुसाद संग्रहालयात बघायला मिळतात.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केलाय जात आहे. फोटोमध्ये नरेंद्र मोदी मेकअप करून घेत नाहीयेत, तर लंडनमधील मॅडम तुसाद संग्रहालयातील पुतळ्यासाठी मोदींच्या शरीराचे माप घेतले जात आहे.
हेही वाचा- नरेंद्र मोदींनी स्वतः ‘छोट्या चोरापासून लुटेरा’ बनल्याची कबुली दिल्याचा व्हायरल व्हिडीओ एडीटेड!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment