जेएनयूचा विद्यार्थी शर्जिल इमामच्या सुटकेची मागणी (Release Sharjeel Imam) करणाऱ्या मोर्चाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जातोय. दावा करण्यात येतोय की हा फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनादरम्यानचा आहे.
शेतकरी आंदोलनाने ‘एमएसपी’ ते ‘एफएसआय’ (फ्री शर्जिल इमाम) असा मोठाच प्रवास पूर्ण केला असल्याचा दावा भाजप युवा मोर्चाशी संबंधित वैशाली पोद्दार यांनी हा फोटो पोस्ट करताना केलाय.
शर्जिल इमाम हा ‘कृषी दर्शन’चा प्रमुख असल्याचा उपरोधिक दावा करून ह्या फोटोचा शेतकरी आंदोलनाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातोय.
पडताळणी:
शर्जिल इमाम जेएनयूचा विद्यार्थी असून त्याला जानेवारी २०२० मध्ये कथितरित्या देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. इमामावर धर्माच्या आधारे गुन्हेगारी कारस्थान, देशद्रोह आणि दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान यांसारखे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. इमामच्या जामीन प्रकरणाची सुनावणी 17 डिसेंबर रोजी होणार आहे.
व्हायरल फोटो व्यवस्थित निरखून बघितला तर आपल्या लक्षात येईल की फोटोमध्ये जे ‘फ्री शर्जिल इमाम’ बॅनर दिसतंय, त्याच्या डाव्या कोपऱ्यात ‘वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया’ असं लिहिलेलं आहे. सहाजिकच हा फोटो संबंधित पक्षाच्या मोर्चादरम्यानचा आहे.
आम्हाला यासंदर्भातील ‘इंडिया टुडे’चा रिपोर्ट देखील वाचायला मिळाला. रिपोर्टनुसार ‘वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया’च्या केरळ शाखेचे राज्य सचिव साजिद खालिद यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना व्हायरल फोटो चालू वर्षीच्या फेब्रुवारीत तिरुअनंतपुरममध्ये पक्षाने काढलेल्या सीएएविरोधी मोर्चादरम्यानचा असल्याची माहिती दिली आहे.
पक्षाने फेब्रुवारी २०२० मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तिरुअनंतपुरममध्ये ‘ऑक्युपाय राजभवन‘ निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात शर्जिल इमामच्या सुटकेची मागणी (Release Sharjeel Imam) करण्यात आली होती, असेही साजिद खालिद यांनी सांगितले.
साजिद खालिद यांच्याकडून मिळलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही गुगलवर किवर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला ‘ऑक्युपाय राजभवन’ मोर्चाविषयीच्या बातम्या वाचायला मिळाल्या. त्यातून खालिद यांनी दिलेल्या माहितीची पुष्टी होऊ शकली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोचा सध्याच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.
सोशल मीडियावरील व्हायरल फोटो जवळपास ८ महिने जुना असून ‘वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाने केरळमधील तिरुअनंतपुरम येथे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आयोजित केलेल्या रॅलीदरम्यानचा आहे.
हे ही वाचा- शेतकरी आंदोलक आता काश्मीर प्रश्नावरील ‘आर्टिकल ३७०’ पुन्हा लागू करा म्हणतायेत?
Be First to Comment