उत्तर प्रदेशातील बीजनोरमधील मदरश्यात छापा मारून (bijnor madarsa raid) पोलिसांनी अवैध हत्यार जप्त केले आणि ६ मौलवींना अटक केल्याचा दावा करणारी एक पोस्ट फेसबुक आणि व्हॉटसअपवर फिरतेय.
‘#बिजनौर (यूपी) में #मदरसे पर मारे गये छापे में बरामद हथियारों का जखीरा 6 मौलवी गिरफ्तार…चिन्ता वाली बात इसमें यह है कि #LMG गन का मिलना…एक मिनट में #8_हज़ार_राउण्ड फायरिंग की क्षमता वाली मशीनगन।समझिए इन लोगों की तैयारी को… इन्होंने #आपका_भविष्य तय कर दिया। बस इनके #मन_मुताबिक़_सरकार आने की देर है।साभार’
अशा मजकुरासह तीन फोटोज व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक भालचंद्र जोहारी यांनी निदर्शनास आणून दिले.
हाच मजकूर आणि तेच फोटो असणाऱ्या गेल्या काही महिन्यांतील फेसबुकपोस्ट सुद्धा आम्हाला सापडल्या.
हेच दावे ट्विटरवर सुद्धा करण्यात आले होते.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणी करताना सर्वात आधी आम्ही एकेक फोटो रिव्हर्स सर्च करून पाहिला आणि सत्य समोर आलं.
पहिला फोटो:
वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका, रायफल्स सारखे शस्त्रास्त्र सोफ्यावर ठेवलेला हा फोटो ३ मार्च २०१९ रोजी tumblr वर पोस्ट करण्यात आला आहे. ‘My first Love was a gun’ या पेजवर विविध बंदुकांच्या फोटोजसोबत हा सुद्धा फोटो आहे.
दुसरा फोटो:
शामली पोलिसांनी २९ जुलै २०१९ रोजी मदरशात अवैध देशी-विदेशी मुद्रा, मोबाईल, आणि दस्तावेज साठवून ठेवल्याच्या आरोपाखाली ७ मौलवींना अटक केली होती त्यावेळचा फोटो आहे. याविषयी शामली पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली होती.
तिसरा फोटो:
हा फोटो पंजाबमधील पटियाला येथील खालसा किरपान कारखान्यातील आहे. कारखान्याच्या फेसबुक पेजवर असे किरपान असणारे अनेक फोटो आपण पाहू शकता.
बिजनौर मदरशावर छापा मारल्याची घटना खरी:
उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील शेरकोट पोलीस स्टेशनच्या हद्दीत मदरशावर धाड (bijnor madarsa raid) टाकली होती. त्यात औषधांच्या बॉक्समध्ये बंदुका आणि काडतुसे आढळून आली. या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेण्यात आले होते परंतु ही घटना ताजी नसून २०१९च्या जुलै महिन्यातील आहे. घटनेबद्दल सविस्तर बातमी दैनिक भास्करने केली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की उत्तर प्रदेशातील बिजनौरभागातील मदरशावर छापे मारण्यात आले आणि बंदुके, काडतुसे मिळाल्याची घटना खरी आहे परंतु ती आताची नसून २०१९ मधील आहे.
तसेच सोबत व्हायरल होत असलेले तीनही फोटो मूळ घटनेशी संबंधीत नसून वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. जुन्या बातमीला भलतेच फोटोज लाऊन सद्यस्थितीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
हेही वाचा: दुर्गा वाहिनी कार्यकर्तीच्या नावे जातीय तेढ निर्माण करणारी जुनी फेक पोस्ट होतेय नव्याने व्हायरल!
Be First to Comment