सोशल मिडीयावर सध्या ‘मुंबईत कोरोनाच्या नावावर अवयव तस्करीचा घोटाळा’ (corona organ trafficking scam) सुरु असल्याचा दावा प्रचंड व्हायरल होतोय. या दाव्यासह चार फोटोज देखील व्हायरल होताहेत.
‘हुसैन आझम’ या फेसबुक पेजवरून २ फोटोजसह इंग्रजीत टाकलेली पोस्ट ६३०० पेक्षा अधिक युजर्सनी शेअर केलीये.
‘लव्ह इंडिया न्यूज’ पेजवरून देखील हीच पोस्ट हिंदीमध्ये शेअर करण्यात आलीये. या पोस्टसोबत ४ फोटोज जोडलेले आहेत. ही पोस्ट सुद्धा जवळपास ३१०० युजर्सनी शेअर केलीये.
काय म्हंटलंय पोस्टमध्ये ?
कोरोनाच्या नावावर नवीन घोटाळा
भायंदरमधील गोराईमध्ये कोरोनाची केस नव्हती, मात्र छोट्याशा आजारामुळे चेक करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये भरती करून रिपोर्ट पॉझिटीव्ह सांगण्यात आला.
अचानक त्याचा मृत्यू झाला आणि शरीर जाळण्यासाठी पॅक करण्यात आलं, मात्र कुटुंबाने आग्रह धरल्याने पॅक करण्यात आलेली डेडबॉडी खोलण्यात आली. त्यात शरीरातील सर्व अवयव गायब आढळले.
महाराष्ट्रात मृत शरीरासंबंधीचा कोरोना घोटाळा (corona organ trafficking scam) उघडकीस आल्याने सगळीकडे घबराट आहे. ज्यांना ईश्वराचं रूप मानलं जातं, ते डॉक्टर असं राक्षशी कृत्य कसं करू शकतात?
प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी. कोरोना काळात लोकांची हत्या करून अवयव तस्करी करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.
पडताळणी :
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल पोस्टची पडताळणी सुरु केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की फोटोज सोबत जी इंग्रजी पोस्ट व्हायरल होतेय, त्या खाली ओम शुक्ला दिल्ली क्राईम प्रेस असं लिहिलेलं आहे. त्यामुळे मग आम्ही या दिल्ली क्राईम प्रेसशी संबंधित ओम शुक्लाचा शोध घेतला, त्यावेळी आम्हाला दिल्ली क्राईम प्रेसच्या वेबसाईटवरती २० जुलै २०२० रोजी प्रकाशित ‘कोरोना के नाम पर नया घोटाला’ या हेडलाईनसह प्रसिद्ध बातमी सापडली.
सोशल मिडीयावर व्हायरल दावा आणि फोटोजचा मूळ स्रोत म्हणजे हीच बातमी !
ओम शुक्लाच्या शोधात असताना आम्हाला वर्षा वर्मा यांची एक फेसबुक पोस्ट मिळाली. ज्या पोस्टमध्ये त्यांनी ओम शुक्लाने आपले फोटोज चुकीच्या दाव्यांसह चुकीची बातमी देण्यासाठी वापरल्याचं म्हंटलंय.
‘चेकपोस्ट मराठी’ने वर्षा वर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमचं बोलणं त्यांचे सहकारी दीपक महाजन यांच्याशी झालं.
दीपक महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आणि वर्षा मिळून उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ‘एक दिव्य कोशिश’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात. यामध्ये ते गोर-गरीब, निराधारांचे अंत्यसंस्कार करतात. सोशल मिडीयावर व्हायरल झालेले फोटोज हे अशाच एका अंत्यसंस्काराचे आहेत.
लखनऊमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या अंत्यसंस्काराचे हे फोटोज ओम शुक्लाने आपल्या बातमीत वापरलेत. ओम शुक्लाच्या बातमीतील दावे साफ खोटे आहेत.
आपण ओम शुक्लाशी संपर्क साधून त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र, पत्रकार असल्याचे सांगून त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं महाजन यांनी सांगितलं. तसेच आपण शुक्ला विरोधात गोमतीनगर एक्स्टेंशन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असल्याची माहिती महाजन यांनी ‘चेकपोस्ट मराठी’शी बोलताना दिली.
शुक्ला यांचा शोध घेताना आम्हाला त्यांचं फेसबुक अकाऊंट मिळालं. ज्यावरच्या एका पोस्टमध्ये कोरोनाच्या संदर्भातील महाराष्ट्रातील बातमी शेअर न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. बातमीच्या पडताळणीमध्ये ती फेक असल्याचं लक्षात आलीये असं शुक्लाने लिहिलंय. असं असलं तरी शुक्लाने मात्र आपल्या पोर्टलवरून अद्यापपर्यंत ती बातमी डिलीट केलेली नाही.
भायंदरमधील गोराई येथील ‘कोरोना पेशंटचे अवयव गायब’ केले जात असल्याचा दावा आठवडाभरापूर्वी देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हा दावा फेक असल्याच समोर आलं होतं. तिथल्या नगरसेविका आणि गोराई पोलिसांनी हे दावे फेक असल्याचं सांगितलं होतं. याबद्दलचा आमचा सविस्तर रिपोर्ट तुम्ही येथे वाचू शकता.
वस्तुस्थिती :
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की मुंबईतील कोरोना रुग्णाच्या अवयव तस्करीचे दावे फेक आहेत. या दाव्यांसाठी वापरण्यात आलेले फोटोज मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील देखील नसून उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहेत.
स्वतः बातमी देणाऱ्या रिपोर्टरने ही बातमी फेक असल्याचं सांगून झालंय. शिवाय रिपोर्टरच्या विरोधात गोमतीनगर एक्स्टेंशन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर देखील दाखल करण्यात आलीये.
हे ही वाचा- कोरोना साथीला बनावट म्हणणारे डॉ. विश्वरूप आणि हर्षद रुपवतेंचा लेख किती विश्वासपात्र?
[…] हे ही वाचा- ‘मुंबईत कोरोनाच्या नावावर अवयव तस्कर… […]
[…] हेही वाचा: ‘मुंबईत कोरोनाच्या नावावर अवयव तस्कर… […]
[…] हेही वाचा: ‘मुंबईत कोरोनाच्या नावावर अवयव तस्कर… […]