पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथे अटल बोगद्याचे (atal tunnel) उद्घाटन केले. हा जगातला सर्वात लांब बोगदा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सोशल मीडियात मात्र अटल बोगद्याचा म्हणून भलत्याच बोगद्याचा फोटो व्हायरल होतोय.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद शहनवाज हुसैन यांनी बोगद्याच्या उदघाटना पूर्वी ट्विटरवरून हा फोटो शेअर केला होता. या निमित्ताने देशाचे स्वप्न साकार होत असल्याचे सांगत त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या होत्या.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केलाय. अटल बोगद्याच्या (atal tunnel) निर्मितीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊन या बोगद्यामुळे मनाली ते लेह दरम्यानचे अंतर ४ ते ५ तासांनी कमी होणार असल्याचे गुप्ता यांनी म्हंटले आहे.
दिल्ली भाजपचे नेते नरेंद्र कुमार चावला यांनी देखील तोच फोटो त्याच कॅप्शनसह ट्विट केला आहे.
मुंबई तरुण भारतने ‘अटल टनेल’ ठरणार गेमचेंजर हेडलाईनखाली प्रकाशित बातमीची फिचर इमेज म्हणून हा फोटो वापरलाय, तर दै. लोकमतच्या बातमीत देखील हा फोटो बघायला मिळाला.
राष्ट्रीय माध्यमांमध्ये ‘आज तक’ ‘झी न्यूज’ ‘पंजाब केसरी’ ‘प्रभात खबर’ यांनी आपल्या बातम्यांमध्ये अटल बोगद्याचा म्हणून हाच फोटो वापरलाय.
पडताळणी:
अटल बोगद्याचा म्हणून शेअर केला जात असलेला हा फोटो रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने सर्च केला असता तो अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील डेविल्स स्लाइड टनेल असल्याचे समजले.
सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 15 मैलांच्या अंतरावर असणारा हा बोगदा टॉम लैंटॉस या नावाने देखील ओळखला जातो. बोगद्याच्या निर्मितीचे काम सुरु असताना दि. ४ ऑगस्ट २०१२ रोजी एका ब्लॉगवर हा फोटो अपलोड करण्यात आला होता.
आम्ही गुगलवर डेविल्स स्लाइड टनेल सर्च केलं असता या बोगद्याचे बरेच फोटोज मिळाले, जे व्हायरल फोटोत दिसणाऱ्या बोगद्याशी मिळतेजुळते आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या अटल बोगद्याचे फोटोज सर्च केले असता प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डलवरती हे फोटोज बघायला मिळाले. प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आलेले फोटोज हे व्हायरल फोटोजपेक्षा संपूर्णतः भिन्न आहेत.
मुख्य प्रवाहातल्या अनेक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये देखील अटल बोगद्याचे फोटोज प्रकाशित केले आहेत. या फोटोंमध्ये आणि व्हायरल फोटोमध्ये प्रचंड तफावत आहे.
वस्तुस्थिती:
मुख्य प्रवाहातल्या अनेक माध्यमांनी आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून अटल बोगद्याचा म्हणून भलताच फोटो शेअर केला गेलाय. अटल बोगद्याचा म्हणून शेअर केला गेलेला फोटो ८ वर्षांपूर्वीचा असून अमेरिकेतील डेविल्स स्लाइड टनेलचा आहे. त्याचा अटल बोगद्याशी काहीही संबंध नाही.
हे ही वाचा- श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा- भाजप नेत्यांनी शेअर केला तिरंग्याचा एडिटेड फोटो!
[…] […]
[…] […]