Press "Enter" to skip to content

‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो!

‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे’च्या (Delhi Mumbai Expressway) एकूण लांबीपैकी ३५० किमीचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित ८२५ किमीचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

नितीन गडकरी यांनी देखील राज्य सभेतील उत्तरानंतर सोशल मीडियावर ‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे’चा फोटो म्हणून हाच फोटो शेअर केला होता. त्यांनी नंतर आपलं ट्विट डिलीट केलं.

Advertisement

नितीन गडकरींच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मात्र लगेचच ‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे’चे (Delhi Mumbai Expressway) काम अतिशय वेगाने सुरु असल्याच्या दाव्यासह ‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे’चा म्हणून एक फोटो शेअर केला जायला लागला. भाजपचे नेते प्रवीण अलई यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो अपलोड केलाय.  

अर्काइव्ह

‘इंडिया टीव्ही’ने आपल्या वेबसाईटवर नितीन गडकरी यांच्या राज्यसभेतील वक्तव्याची बातमी दिली. बातमीमध्ये ‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे’चे काम अतिशय वेगाने सुरु असल्याचे सांगण्यासाठी गडकरींच्या ट्विटमधील फोटो वापरण्यात आलाय.

अर्काइव्ह 

पडताळणी:

रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर ५ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो वापरण्यात आला असल्याचे आढळून आले. या बातमीनुसार हा फोटो ‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे’चा नसून उत्तर प्रदेशातील ‘यमुना एक्सप्रेसवे’चा (Yamuna Expressway) आहे.

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोएडा, ग्रेटर नोएडा आणि फरिदाबादच्या नागरिकांना दिवाळी गिफ्ट दिलं असून राज्य सरकारकडून फरीदाबाद-ग्रेटर नोएडाला जोडणाऱ्या रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रोड ‘यमुना एक्सप्रेसवे’ पर्यंत बनवला जाईल, असं या बातमीत सांगण्यात आलं होतं.

Source: Times of India

जेएसडब्ल्यू स्टीलच्या वेबसाईटवर देखील हा फोटो बघायला मिळाला. या वेबसाईटवर देखील फोटो ‘यमुना एक्सप्रेसवे’चाच असल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकल्पाचं उदघाटन २०१४ साली झालं असून रस्ते वाहतुकीमधील मैलाचा दगड ठरलेल्या या १६५ किमीच्या प्रकल्पाच्या निर्मितीचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असं देखील वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.

Source: JSW

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर ‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे’चा म्हणून शेअर केला जात असलेला फोटो हा ‘यमुना एक्सप्रेसवे’चा आहे. ‘यमुना एक्सप्रेसवे’चे उदघाटन २०१४ मध्येच झालेले आहे.

हेही वाचा- न्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा