सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोत एकाच वेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचं दिसतंय. कोरोना काळातील भयावह परिस्थिती दर्शविण्यासाठी अनेकांकडून हा फोटो शेअर केला जातोय.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अमरीश रंजन पांडेय यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर कोरोना काळातील भयावह परिस्थितीत एसएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसशीच संबंधित हॅरिस बट्ट यांनी देखील हाच फोटो शेअर केलाय.
अनेकांनी हा फोटो शेअर करत कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचं सांगत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची देखील मागणी देखील केली.
पडताळणी:
कोरोनामुळे देशातील अनेक ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जागाच नसल्याचे समोर आले आहे. तर काही ठिकाणी एकाच चितेवर अनेकांचे अंत्यसंस्कार केले गेले आहेत. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणचे वेगवेगळे फोटोज वेगवेगळ्या दाव्यांसह व्हायरल होताहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो नेमका कधीचा आणि कुठला हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘हिंदी स्क्रिप्ट रायटर’ या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये हाच फोटो मिळाला.
ब्लॉगवर उपलब्ध माहितीनुसार कृष्णा शर्मा यांनी 25 जानेवारी 2012 रोजी स्मशानभूमीचा हा फोटो ब्लॉगवर अपलोड केला होता. या फोटोबरोबर ब्लॉगमध्ये अजूनही काही फोटोज आहेत. ब्लॉगपोस्टचे हेडलाईन असे की “बनारस, जगातील सर्वात प्राचीन शहर अद्याप जिवंत आहे. (वाराणसीचा मणिकर्णिका घाट)”
ब्लॉगवर हा फोटो अपलोड केलेल्या कृष्णा शर्मा यांचा मोबाईल नंबर देखील उपलब्ध आहे. आम्ही या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता कृष्णा यांनी सांगितले की सध्या व्हायरल होत असलेला फोटो वाराणसीतील मणिकर्णिका घाटातील आहे. हा फोटो २०१२ साली आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून घेतला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोचा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या चितांशी काहीएक संबंध नाही.
व्हायरल फोटो कोरोना काळातील नसून जवळपास ९ वर्षे जुना आहे. कृष्णा शर्मा यांनी २०१२ साली घेतलेला हा फोटो सध्या कोरोना काळातील भयावह चित्र म्हणून सर्वत्र फिरवला फिरवला जातोय.
Be First to Comment