राज्याच्या विविध भागांना पावसाने झोडपले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय.
सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमध्ये एक कपड्याचे शोरूम दिसत असून या शोरूममध्ये पावसाचे पाणी शिरल्याने ते पूर्णपणे भरलेले दिसतेय. दावा केला जातोय की हे बोरिवलीमधील रेमंड शोरूमचे दृश्य आहे.
फेसबुकवर देखील हा फोटो अशाच प्रकारच्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधला असता ‘न्यूज १८ बिहार’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून २८ सप्टेंबर २०१९ रोजी हा फोटो अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. फोटोच्या कॅप्शननुसार २०१९ मधील पाटण्यातील पूरादरम्यानचे हे फोटोज आहेत. या पूराच्या वेळी पाटण्यातील हथुआ मार्केटमधील रेमंडच्या शोरूममध्ये पाणी घुसले होते.
‘नई दुनिया’च्या वेबसाईटवर २८ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध ‘लौटते मानसून ने बिहार में मचाई तबाही, पटना के रेमंड शोरूम में घुसा पानी’ या हेडलाइनखाली प्रकाशित बातमीमध्ये देखील व्हायरल फोटो बघायला मिळाला.
बातमीनुसार पाटण्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये सहा फूटांपर्यंत पाणी तुंबले होते. खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या घरात देखील दोन फूटांपर्यंत पाणी साचले होते. बिहार सरकारमधील मंत्री प्रेम कुमार आणि नंद किशोर यादव आदींच्या घरात देखील पावसाचे पाणी घुसले होते. पावसाचे पाणी आत शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या रेमंड शोरूमचे इतरही फोटोज या बातमीमध्ये बघायला मिळतात.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर मुंबईतील कपड्याच्या शोरुमचा म्हणून व्हायरल फोटो बिहारची राजधानी पाटण्यामधील रेमंडच्या शोरुमचा आहे. शिवाय फोटो सध्याचा नसून २०१९ मधील आहे.
हेही वाचा- ‘अपहेलिअन फेनॉमेना’मुळे 22 ऑगस्टपर्यंत हवामान अधिक थंड राहणार असल्याचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- पावसाच्या पाण्याने भरलेले हे कपड्याच… […]