महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक जुना फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) एका व्यक्तीला टिळा लावताना बघायला मिळताहेत. दावा केला जातोय की दस्तरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपला आशीर्वाद दिला होता.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता लोकमतच्या वेबसाईटवर 15 मे 2022 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. या बातमीनुसार फोटोमध्ये बाळासाहेबांबरोबर दिसणारी व्यक्ती दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसाद ओक अभिनित धर्मवीर चित्रपट बघितल्यानंतर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या संदर्भातील एक किस्सा सांगितला होता.
उद्धव ठाकरे सांगतात की आनंद दिघे कधीच वेळेवर यायचे नाहीत. त्यामुळे बाळासाहेब चिडायचे. मग आनंद दिघे बाळासाहेबांसमोर शांतपणे उभे राहायचे. मग बाळासाहेब कशाला आलास अशी विचारणा करायचे. त्यावेळी आनंद दिघे ठाण्यात निवडणूक आहे. उमेदवारांची यादी दाखवायला आलोय, असे उत्तर द्यायचे. मग बाळासाहेब एकच प्रश्न विचारायचे. भगवा फडकवशील ना? आनंद दिघे हो असं उत्तर द्यायचे. मग बाळासाहेब त्यांना जा कर तुला पाहिजे ते, असं बाळासाहेब सांगायचे. बाळासाहेब त्या यादीला हातही लावायचे नाहीत. इतका विश्वास बाळासाहेबांचा दिघेंवर होता. पक्षावर, पक्षप्रमुखांवर दिघेंची प्रचंड निष्ठा होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो दिशाभूल करणारा आहे. व्हायरल फोटोत बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर दिसणारी व्यक्ती शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे नसून शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आहेत.
हेही वाचा- आदित्य ठाकरेंनी ट्विटर बायोमधून मंत्रिपदाचा उल्लेख हटविल्याच्या बातम्या फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]