सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारात गंभीररीत्या जखमी झालेल्या आंदोलक शेतकऱ्याचा (farmer brutally beaten by delhi police) म्हणून एक फोटो व्हायरल होतोय. फोटोतील युवकाला पाठीचे कातडे निघेपर्यंत मारहाण झाल्याचे दिसतेय. ही घटना प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यानची असल्याचा दावा केला जातोय.
काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विटरवर हा फोटो पोस्ट केलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये अलका लांबा म्हणताहेत, “पोलिसांचा संयम केवळ दंगलखोरांसाठी होता, नाहीतर हे असे हाल भाजपच्या दीप सिद्धूचे झाले असते.”
अलका लांबा यांचं ट्विट साधारणतः १२०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.
काँग्रेसचे मीडिया पॅनलिस्ट सुरेंद्र राजपूत यांनी देखील हाच फोटो ट्विट केलाय.
पडताळणी:
व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘हरयाणा टाइम्स’ या वेब पोर्टलच्या फेसबुक पेजवरून १७ जून २०१९ रोजी हा फोटो शेअर केला गेला असल्याचे आढळून आले. फोटोच्या कॅप्शननुसार संबंधित युवकाला दिल्ली पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे काही किवर्डसह गुगल सर्च केलं असता आम्हाला ‘नवोदय टाइम्स’च्या वेबसाईटवर जून २०१९ मध्ये प्रसिद्ध बातमीत देखील हा फोटो मिळाला. या बातमीनुसार घटना दिल्लीच्या मुखर्जीनगर भागातील असून फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव सरबजीत आहे.
सरबजीत ऑटो चालक असून त्यांचा काही कारणावरून दिल्ली पोलिसांशी वाद झाला होता. दिल्ली पोलिसांशी झालेल्या वादात सरबजीतने स्वतःच्या बचावात कृपान काढली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या तुकडीने सरबजीत आणि त्यांच्या मुलाला जवळपास अर्धा तास बेदम मारहाण केली होती.
याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून मुखर्जीनगर घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांवर टीका केली होती. दिल्ली पोलिसांचे हे कृत्य निर्घृण असून या संपूर्ण घटनेची निःपक्षपाती चौकशीची आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
वेगवेगळ्या माध्यमांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातम्यांनुसार याप्रकरणी गृह मंत्रालयाकडून रिपोर्ट देखील मागविण्यात आला होता. शिवाय दिल्ली पोलिसांच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटोचा सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.
दिल्ली पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्याला केलेल्या बेदम मारहाणीचा (farmer brutally beaten by delhi police) म्हणून शेअर केला जात असलेला हा फोटो दिल्लीमधील मुखर्जीनगर भागातील ऑटो चालक सरबजीतचा आहे. शिवाय ही घटना साधारणतः साधारणतः दिड वर्षांपूर्वीची आहे.
हे ही वाचा- शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचे सांगण्यासाठी शेअर केला जातोय अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांचा व्हिडीओ!
Be First to Comment