सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल होतंय. ग्राफिकमध्ये हिरव्या आणि सफेद ड्रेसमधील काही तरुण दिसताहेत. दावा केला जातोय की केरळमधील पीएफआयने (PFI) भारताविरुद्ध लढण्यासाठी मुस्लिम सेनेची (Muslim Army) स्थापना केली आहे.
पडताळणी:
- पीएफआय केरळचे सचिव एस निसार यांनी देखील व्हायरल फोटोमधील तरुण पीएफआयचे सदस्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. पीएफआयच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी 17 मार्च रोजी संघटनेकडून एकता मोर्चा काढला जातो.
- २०२० मध्ये देखील २० केंद्रांवर एकता मोर्चे काढण्यात आले होते. प्रत्येक एकता मोर्चामध्ये संघटनेचे कार्यकर्ते संघटनेचा ड्रेस घालतात. मात्र व्हायरल फोटोमधील ड्रेस आमच्या संघटनेचा नाही, असेही निसार यांनी सांगितले आहे.
- फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘मुस्लिम युथ लीग’ या फेसबुक पेजवरून ऑक्टोबर २०१२ मध्ये शेअर करण्यात आलेला फोटो मिळाला.
- या फोटोमधील तरुणांच्या अंगारील ड्रेसमध्ये आणि व्हायरल फोटोमधील तरुणांच्या अंगावरील ड्रेसमधील साधर्म्य आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येऊ शकतं.
- फोटोमध्ये दिसणारे तरुण इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या युथ लीगचे (Muslim Youth League) कार्यकर्ते आहेत. त्यांचा पीएफआयशी काहीही संबंध नाही. फेसबुक पेजवरून याच ड्रेसमधील तरुणांचे इतरही फोटोज शेअर केले गेले आहेत.
‘पीएफआय‘
पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. गेल्या वर्षभरात ही संस्था या ना त्या कारणाने चर्चेत आहे. २००४ साली केरळची नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट, कर्नाटकची फोरम फॉर डिग्नीटी आणि तामीळनाडूची मनिथ निती पासरई या संघटना एकत्र आल्या. २००६ मध्ये यात गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि पश्चिम बंगाल इथल्या संघटनांचेही विलिनिकरण झाले आणि त्यातून जन्माला आली पॉप्युलेशन फ्रंट ऑफ इंडिया.
दिव्य मराठीमधील लेखानुसार पीएफआय ही “सिमी’ या अतिरेकी संघटनेचे बदललेले रुप असल्याचा आरोप पीएफआयवर सातत्याने केला जातो. सिमीवर बंदी घातल्यानंतर सिमीचे अनेक कार्यकर्ते पीएफआयमध्ये सहभागी झाले. पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दुल रेहमान हे एकेकाळी सिमीचे राष्ट्रीय सचिव होते. पीएफआयच्या केरळ संघटनेचे अनेक कार्यकर्ते फार पूर्वीपासून सिमीचे काम करत होते. पीएफआयने मात्र या गंभीर आरोपाचा नेहमीच इन्कार केला आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल ग्राफिकमधील दावा चुकीचा आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या युथ लीगच्या कार्यकर्त्यांचा फोटो पीएफआय मुस्लिम आर्मीचा (PFI Muslim Army) म्हणून व्हायरल केला जातोय. शिवाय हे कार्यकर्ते भारताविरुद्ध लढण्यासाठीची तयारी करत असल्याच्या दाव्यांनाही कुठलाही आधार नाही.
हेही वाचा- मुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment