उत्तर प्रदेशातील ज्ञानपूर विधानसभेचे भाजप आमदार विपुल दुबे (Vipul Dubey) यांनी पगार मागितल्याच्या कारणावरून कामगारास बेदम मारहाण केल्याचे दावे एका व्हिडीओसह सोशल मीडियात अनेक दिवसांपासून जोरदार व्हायरल होतायेत. सदर मारहाण कुठल्याशा कार्यालयात होत असल्याचे दिसतेय. त्यात भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ सुद्धा दिसते आहे.
इंडिया न्यूज नेटवर्कचे कार्यकारी अधिकारी असणारे राणा यशवंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सदर व्हिडीओ शेअर केला आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अनिल म्हापसेकर यांनी सदर व्हिडीओ व्हॉट्सऍपवरही शेअर होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केलीय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने गुगल कीवर्ड्सच्या माध्यमातून पडताळणीस सुरुवात केली असता सदर घटनेविषयी कुठलीही अधिकृत माहिती आम्हाला सापडली नाही, परंतु वर नमूद केलेले राणा यशवंत यांचे ट्विट आम्हाला सापडले. या ट्विटखाली अनेक भाजप समर्थकांनी सदर दावे फेक असल्याचे सांगितले आहे.
याच ट्विटवर भदोही पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रिप्लाय देखील आला आहे. यामध्ये त्यांनी सदर घटना भदोही, नव्हे तर शहाजहानपूरची असल्याचे सांगत शहाजहानपूर पोलीस अधिकाऱ्याच्या स्पष्टीकरणाचा व्हिडीओही शेअर केला आहे.
दैनिक भास्करच्या बातमीनुसार सदर घटना घडून गेल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला. लोकांनी मुख्यमंत्री-अधिकारी यांना तो व्हिडीओ पाठवला टॅग केला तेव्हा कुठे तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आणि एका तासात जामीनावर सोडूनही दिले. व्हिडीओमध्ये बंदुक स्पष्टपणे दिसत असूनही पोलिसांनी साधेसुधे कलमे लाऊन ‘अटक’ करण्याची गरज नसल्याची सबब पुढे करत तत्काळ जामिनाचे समर्थन केले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सदर घटना आताची नसून एप्रिल २०२२ मधील आहे. मारहाण करणारी व्यक्ती आमदार विपुल दुबे नाहीत. ही शहाजहानपूर येथील घटना आहे. आरोपींविरोधात कायदेशीर तक्रारीची नोंद झाली आहे.
हेही वाचा: पक्षातीलच आमदाराला बुटाने मारणारे ‘आप’ नेते संजय सिंह नाहीत, ते तर भाजप नेते!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]
[…] […]