Press "Enter" to skip to content

सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या गोल्डी ब्रारचा म्हणून दुसऱ्याच गँगस्टरचा फोटो व्हायरल!

गेल्या आठवड्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose Wala) पंजाबमधील मानसा येथे काही अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर लगेचच गोल्डी ब्रार (Goldy Brar) या गँगस्टरने या हत्येची जबाबदारी घेतली. आता सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होतोय. फोटोतील व्यक्ती गँगस्टर गोल्डी ब्रार असल्याचे सांगितले जातेय.

लोकसत्ताच्या बातमीमध्ये देखील गोल्डी ब्रारचा म्हणून याच व्यक्तीचा फोटो वापरण्यात आलाय.

Advertisement

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला पंजाब सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 5 एप्रिल 2021 रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हा फोटो बघायला मिळाला. या ट्विटमध्ये सदर व्यक्ती लॉरेंस बिश्नोई गॅंगचा सदस्य आणि गोल्डी ब्रारचा (Goldy Brar) मुख्य सहकारी गगन ब्रार (Gagan Brar) असल्याचे सांगण्यात आले आहे.

फरीदकोट युवक काँग्रेसचे प्रमुख गुरलाल सिंग पहेलवान (Gurlal Singh Pehlwan) यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गगन ब्रारला पंजाब पोलिसांनी हिमाचल प्रदेशमधील कसौल येथून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

अमर उजालाच्या वेबसाईटवर या कारवाई संदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीनुसार गगन ब्रार याने गोल्डी ब्रारच्या इशाऱ्यावरून फरीदकोटमधील युवक काँग्रेसचे नेते गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येची योजना बनविण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. पंजाब आणि हिमाचल प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

दरम्यान, सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतल्यानंतर गोल्डी ब्रार संबंधित अनेक बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये त्याचे फोटोज बघायला मिळतात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या गोल्डी ब्रारचा म्हणून त्याचा साथीदार गगन ब्रार याचा फोटो शेअर केला जातोय. काही माध्यमांनी देखील देखील आपल्या बातम्यांमध्ये गोल्डी ब्रारचा म्हणून गगन ब्रार याचा फोटो वापरलाय.

हेही वाचा- सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या गोल्डी ब्रारचे मुख्यमंत्री भगवंत मान कनेक्शन फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा