सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. व्हायरल फोटोत एक व्यक्ती एका महिलेचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतेय. फोटोतील व्यक्तीच्या डोक्यावर नेहरू टोपी देखील बघायला मिळतेय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की फोटो १९४२ सालच्या ‘चले जाव’ आंदोलना दरम्यानचा असून फोटोत महिलेचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत असलेली व्यक्ती जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) आहेत.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता मेट्रो या ब्रिटिश वेबसाईटवर 11 डिसेंबर 2013 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. बातमीनुसार फोटो 2013 सालच्या भारताच्या फाळणीवर आधारित ‘ड्रॉइंग द लाईन’ या नाटकातील दृश्याचा आहे.
नाटकामध्ये सिलास कार्सन (Silas Carson) या ब्रिटिश अभिनेत्याने जवाहरलाल नेहरू यांची आणि ल्युसी ब्लॅक (Lucy Black) या अभिनेत्रीने एडविना माउंटबॅटन (Edwina Mountbatten) यांची भूमिका निभावली होती.
हँम्पस्टेड थेटर या वेबसाईटवर देखील या नाटकाविषयी वाचायला मिळते. वेबसाईटवरील नाटकाच्या अधिकृत पेजवर नाटकातील कलाकारांच्या यादीत सिलास कार्सन आणि ल्युसी ब्लॅक हे अनुक्रमे नेहरू आणि लेडी माउंटबॅटन यांच्या भूमिकेत असल्याचे बघायला मिळतेय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दावे चुकीचे आहेत. नेहरूंचा म्हणून शेअर केला जात असलेला फोटो वास्तविकरीत्या भारताच्या फाळणीवर आधारित असलेल्या ‘ड्रॉइंग द लाईन’ या नाटकातील दृश्याचा आहे.
हेही वाचा- नेहरूंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी प्रियंका गांधींच्या ट्विटशी छेडछाड!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment