सोशल मीडियावर एका व्यक्तीचा ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओसंदर्भात बहुतांश माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. बातम्यांमध्ये दावा करण्यात आलाय की व्हिडिओमध्ये डान्स करत असलेली व्यक्ती पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीचे सदस्य आमिर लियाकत हुसैन (Aamir Liaquat Hussain) आहेत.
मराठीमध्ये ‘महाराष्ट्र टाईम्स’ने ‘कतरिना-रविनाला विसरा; पाहा ‘टिप टिप बरसा पानी’वर खासदाराचा मादक डान्स’ या हेडलाइनखाली, तर ‘लोकमत’ आणि ‘झी २४ तास’ने देखील साधारणतः अशाच आशयाच्या बातम्या छापल्या आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी देखील ही बातमी प्रामुख्याने छापली आहे. आज तक, एबीपी न्यूज, न्यूज १८ हिंदी यांसारख्या इतरही महत्वाच्या माध्यमांनी यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
पडताळणी:
बहुतेक बातम्यांमध्ये तैमूर झमान नावाच्या ट्विटर युजरच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलेला व्हिडीओ एम्बेड करण्यात आलाय. याच ट्विटवर सफियह नावाच्या दुसऱ्या एका ट्विटर युजरने आपल्या रिप्लायमध्ये व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती कोरिओग्राफर शोएब असल्याची माहिती दिली आहे.
या माहितीच्या आधारे शोध घेतला असता शोएब शकुर (Shoaib Shakoor) यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ४ जानेवारी रोजी हाच व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले.
पाकिस्तानच्या एचएस स्टुडिओच्या फेसबुक पेजवर याच कार्यक्रमामातील इतरही अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा देखील समावेश आहे. त्यामध्ये शोएब शकूर यांना टॅग करण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स करत असलेली व्यक्ती पाकिस्तानी खासदार नाही, तर एक व्यावसायिक कोरिओग्राफर शोएब शकूर आहे. भारतीय माध्यमांनी व्हायरल व्हिडिओची कुठलीही खातरजमा न करता फेक बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
Be First to Comment