कोरोना लसीकरणा दरम्यान लस घेतल्याची पोज देणाऱ्या एक महिला आणि एका पुरुषाचा ४३ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की भाजप कार्यकर्ते स्वतः कोरोनावरील लस (corona vaccine) टोचून न घेता, केवळ लस टोचून घेतल्याचं नाटक करताहेत आणि सामान्य जनतेला लसीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं जातंय. भाजपकडून कोरोना लसीचा देखील इव्हेन्ट केला जातोय.
व्हाट्सअपवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
सर्वप्रथम आम्ही गुगल एडव्हान्स्ड किवर्डसच्या साहाय्याने व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ‘लेटेस्टली’ पोर्टलवर यासंदर्भातील बातमी मिळाली. बातमीत दावा करण्यात आला आहे की कर्नाटकमध्ये तुमकुर डीएमओ आणि नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांनी कोविड-19 लसीकरणादरम्यान कोवॅक्सिन लस टोचून घेतल्याचा दिखावा केल्याचे समोर आले आहे.
बातमीनुसार, याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. केवळ मीडीया कव्हरेज मिळावे याकरिता हे नाटक केले असल्याचे समजत आहे. 16 जानेवारीपासून कर्नाटक मधील तूमकूर येथे लसीकरणाला सुरूवात झाली. नागेंद्रप्पा आणि रजनी हे दोघे जण लस टोचून घेणाऱ्या सुरूवातीच्या काही लोकांपैकी होते. या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता नेटकर्यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
व्हायरल व्हिडीओ कर्नाटकातील तुमकूर येथील असून व्हिडीओत दिसणाऱ्या पुरुषाचे नाव नागेंद्रप्पा आणि महिलेचे नाव रजनी असल्याचे समजल्यानंतर आम्ही त्याआधारे अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला. यात व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेकडूनच घडलेल्या प्रकाराबाबतीत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात त्या सोशल मीडियावरील दाव्यांचं खंडन करताना दिसताहेत.
कोण आहे व्हायरल व्हिडिओतील महिला?
व्हायरल व्हिडिओत डॉ. रजनी आहेत. त्या तुमकूरच्या नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. आम्ही डॉ. रजनी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे व्हायरल व्हिडीओविषयी विचारणा केली.
डॉ. रजनी यांनी ‘चेकपोस्ट मराठी’शी बोलताना सांगितले की, “मी १६ तारखेलाच कोरोनावरील कोविशील्ड लस (corona vaccine) टोचून घेतली आहे. माझी लस टोचून घेऊन झाल्यानंतर काही पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधी लसीकरणाच्या ठिकाणी आले होते. त्यांना बातमीसाठी लस घेतानाचे फोटोज हवे होते, परंतु मी आधीच लस घेतलेली असल्याने पुन्हा लस घेणे शक्य नव्हते. त्यामुळे केवळ लस घेतानाची पोज देणारे फोटोज घेण्यात आले. लसीचा पुढचा डोस मी २८ दिवसानंतर घेणार आहे “
डॉ. रजनी यांनी यशस्वीरित्या लस टोचून घेतली असल्याचं प्रमाणपत्र देखील उपलब्ध आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसणारी दुसरी व्यक्ती म्हणजे तुमकूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी नागेंद्रप्पा आहेत. त्यांनी देखील व्हायरल व्हिडीओ बाबत तीच माहिती दिली आहे, जे डॉक्टर रजनी यांनी सांगितलं आहे. तुमकूरमधील स्थानिक पत्रकारांनी देखील डॉ. रजनी सांगताहेत त्याप्रमाणे घटनाक्रम झाल्याची माहिती दिली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्ती भाजपशी संबंधित नसून ते दोघेही डॉक्टर आहेत. शिवाय ते लस टोचून घेतल्याचं नाटक करत नसून त्यांचं लसीकरण झालं आहे. त्यासंबंधीचे पुरावे देखील त्यांनी दिले आहेत.
लसिकरणाच्या ठिकाणी उशिरा पोहोचलेल्या पत्रकारांना बातमीसाठी फोटोज घेता यावेत म्हणून पोज देताना जो व्हिडीओ शूट करण्यात आला, तो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल केला जातोय.
हे ही वाचा- अपघातात दावनगिरे मेडिकल असोसिएशनच्या १७ ‘महिला डॉक्टर’ गतप्राण झाल्याचा दावा चुकीचा !
[…] […]