Press "Enter" to skip to content

मंदिराच्या कळसाकडे झेपावणाऱ्या मोराचा व्हिडीओ औरंगाबादमधील खडकेश्वरचा नाही!

झुपकेदार पिसांचा भार सांभाळत स्लोमोशनमध्ये उडणारा मोर मंदिराच्या कळसाजवळ जाऊन बसतो आणि मग त्या पिसाच्या लयीत मंदिरावरील झेंडासुद्धा फडकू लागतो.

Advertisement

अतिशय नयनरम्य आणि दुर्लभ असं हे दृश्य औरंगाबादच्या खडकेश्वर (Khadkeshwar Aurangabad) मंदिराचं असल्याचं सांगितलं जातंय. फेसबुक युजर मिलिंद पोटे यांनी हा व्हिडीओ शेअर करत ‘खडकेश्वर मंदिर, संभाजीनगर (औरंगाबाद)’ असे कॅप्शन दिलेय.

(अर्काइव्ह लिंक)

अॅड. महेश भोसले यांनी सुद्धा आपल्या फेसबुक वॉलवर हा व्हिडीओ शेअर करून तो औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिराचा असल्याचं लिहिलंय.

(अर्काइव्ह लिंक)

‘बिग न्यूज मराठी’च्या फेसबुक पेजवर सुद्धा हा व्हिडीओ औरंगाबादचा म्हणत शेअर झालाय.

व्हायरल व्हिडीओ पाहून हे औरंगाबादचे खडकेश्वर मंदिर नसल्याची शंका उपस्थित करून याबाबत ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करावी अशी विनंती औरंगाबादचे रहिवासी ऋषिकेश होशिंग यांनी केली.

पडताळणी:

१. खडकेश्वर मंदिर?

सदर व्हिडीओ व्यवस्थित पाहिला. औरंगाबादच्या खडकेश्वर (Khadkeshwar Aurangabad) मंदिराचे फोटो सर्च करून या व्हिडीओतील मंदिरासोबत तुलना करून पाहिले तेव्हा लक्षात आलं पांढरा रंग सोडता इतर कसलेही साम्य या दोन मंदिरांत आढळले नाही. कळसाचा आकार, लांबी रुंदी, त्यावरील नक्षीकाम सर्वकाही भिन्न आहे.

२. मंदिरावरील झेंडा

व्हिडीओमधील मंदिर औरंगाबादचे खडकेश्वर (Khadkeshwar Aurangabad) मंदिर नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर कुतूहल जागृत झालं, हा व्हिडीओ नेमका आहे कुठला? पण तत्पूर्वी मंदिरावर असणारा झेंडा काहीसा वेगळाच भासत असल्याचे लक्षात आले. हिंदू मंदिरावर भगवी पताका असते. हा असा लांबलचक झेंडा नेमका कुठला आहे यासाठी शोधाशोध केली तेव्हा असे झेंडे जैन मंदिरावर असल्याचे समजले.

comparison between temple in video and khadkeshwar temple, Aurangabad
Source: Google image search

३. व्हिडीओ नेमका कुठला?

आम्ही व्हिडीओची पहिली फ्रेम गुगल रिव्हर्स सर्च करून पाहिली तेव्हा रिझल्ट मध्ये एक ट्विट आम्हाला मिळाले. त्यात सदर व्हिडीओ शेअर करून त्यावर भाभर तीर्थ , बनासकाठा, गुजरात असं लिहून खाली गुजरातीमध्येही काही मजकूर लिहिलेला होता.

‘जागो जैन जागोरे’ या ट्विटर हँडलवरून सुद्धा हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय आणि त्यांनीसुद्धा हे दृश्य गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्याच्या भाभर तालुक्याचे असल्याचे लिहिले आहे.

हे खरोखर भाभरचे श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर आहे का हे क्रॉसचेक करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु या मंदिराबद्दल फारशी माहिती आणि फोटोज गुगलकडे उपलब्ध नाहीत.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये मंदिराच्या कळसाकडे झेपावणाऱ्या मोराचा व्हायरल व्हिडीओ श्री. मुनिसुव्रत स्वामी, तालुका भाभर, जिल्हा बनासकांडा, गुजरात येथील असल्याचे समजले.

अर्थात या माहितीची खातरजमा करणारे पुरेसे पुरेसे पुरावे न मिळाल्याने तो व्हिडीओ गुजरातमधील आहे हे ठामपणे सांगता येत नाही. मात्र संबंधित व्हिडीओ मधील मंदिर औरंगाबादचे खडकेश्वर मंदिर नाही, एवढं मात्र नक्की.

किंबहुना ते हिंदू मंदिर नसून, जैन मंदिर आहे.

हेही वाचा: हिंदू देवतेचा अपमान करणारा हा व्यक्ती मोहमद अंसारी नाही, तर आझाद कुमार गौतम आहे !

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा