Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदी स्वतःहून शिक्षण सोडल्याची कबूली देतानाचा अर्धवट व्हिडीओ नव्याने व्हायरल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या मुलाखतीतील एक व्हिडीओ क्लिप सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. व्हिडीओ क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या शिक्षणाविषयी (narendra modi fake education) माहिती देताहेत. यात ते कबूल करताना दिसताहेत की त्यांचं केवळ शालेय शिक्षण झालं होतं. त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडून दिलं.

Advertisement

ट्विटर युजर इंदर छूगणी यांनी शेअर केलेल्या या क्लिपमध्ये नरेंद्र मोदी हे आपल्या शिक्षणासंबंधीच्या ‘तुम्ही किती शिकलाय’ या प्रश्नावर उत्तर देताना म्हणताहेत की, मी सतराव्या वर्षानंतरच घर सोडलं. शालेय शिक्षणानंतर मी निघून गेलो. तेव्हापासून आतापर्यंत नवीन गोष्टींच्या शोधात भटकतोय.

त्यावर मुलाखतकाराकडून प्रतिप्रश्न केला जातो की, म्हणजे फक्त शालेय शिक्षण घेतलंय.? प्राथमिक शाळेपर्यंतच?

या प्रश्नाच्या उत्तरात मोदी म्हणताहेत, ‘हायस्कुलपर्यंत’.

बातमी लिहीपर्यंत हे ट्विट १५०० पेक्षा युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय. 

पडताळणी:

सदर व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी हे ‘रुबरु’ या कार्यक्रमात काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांना मुलाखत देताना दिसताहेत. त्यामुळे आम्ही राजीव शुक्ला आणि नरेंद्र मोदी या किवर्डसह युट्यूब सर्च केलं.

आम्हाला युट्यूबवर नरेंद्र मोदी यांनी राजीव शुक्ला यांना दिलेल्या संपूर्ण मुलाखतीची लिंक मिळाली. ही संपूर्ण मुलाखत बघितली असता संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

व्हायरल व्हिडीओतील संवादानंतर पुढे मोदी म्हणतात की “त्यानंतर आमचे संघाचे एक अधिकारी होते. त्यांच्या आग्रहाखातर मी एक्स्टर्नल एक्जाम देण्यास सुरुवात केली. दिल्ली युनिव्हर्सिटीमधून एक्स्टर्नल एक्जाम देऊन बी.ए. पूर्ण केलं.

त्यानंतर देखील त्यांचा (संघाचे अधिकारी) आग्रह कायम राहिल्याने मी एक्स्टर्नल एक्जामच्या माध्यमातून एम.ए. पूर्ण केलं. मी कधीच कॉलेजला गेलो नाही, तरी सुद्धा मी युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलो”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीविषयी मोठ्या प्रमाणात वाद-विवाद (narendra modi fake education) आहेत. आम आदमी पक्षाने देखील नरेंद्र मोदी यांच्या पदवी संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. पक्षाच्या दाव्यानुसार १९७८ सालात फक्त नरेंद्र महावीर मोदी या एकमेव मोदींनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली होती. हे मोदी राजस्थानमधील अलवर या ठिकाणचे होते.

दिल्ली हायकोर्टाकडून २०१८ साली दिल्ली विद्यापीठाला नरेंद्र मोदींच्या पदव्यांच्या संदर्भाने निर्माण झालेल्या वादात हस्तक्षेप करण्याविषयी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र दिल्ली विद्यापीठाने १९७८ साली विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सार्वजनिक करण्यास नकार देण्यात आला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की अर्धवट कट केलेल्या व्हिडीओ क्लिपच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय.

व्हायरल व्हिडीओ कट करण्यात आलेला असून मुलाखतीच्या पुढील भागात नरेंद्र मोदी आपल्या पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणाविषयी माहिती देताना दिसताहेत. आपण एक्सटर्नल एक्झाम देऊन पदवी आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्याचे ते सांगताहेत.

हे ही वाचा- नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी आजवर पेरलेल्या महत्वाच्या फेक न्यूजची पोलखोल!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा